गाझापट्टी सोडा, नाहीतर ‘हमास दहशतवादी’ समजा : इस्रायलचा गाझामधील रहिवाशांना शेवटचा सल्ला
वृत्तसंस्था/ तेल अवीव
‘हमास’च्या हल्ल्यानंतर इस्रायलकडून सातत्याने प्रत्युत्तर दिले जात आहे. इस्रायली सैन्य गाझापट्टीत हवाई हल्ले सुरू ठेवतानाच उत्तर गाझापट्टी खाली करण्याबाबत वारंवार इशारे देत आहे. इस्रायलने अनेकवेळा सर्वसामान्य लोकांना येथून निघून जाण्यास सांगितले आहे. पॅलेस्टिनींनी उत्तर गाझा रिकामा करावा अन्यथा ते दहशतवाद्यांचे मित्र मानले जातील आणि त्यांचा खात्मा केला जाईल, असे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. तसेच गाझापट्टी न सोडल्यास तेथे राहिलेल्या लोकांना ‘हमास दहशतवादी’ समजून कारवाई सुरू केली जाईल, असे बजावत हा अखेरचा तातडीचा इशारा असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.
पॅलेस्टिनींनो, तुम्ही उत्तर गाझामध्ये राहून तुमचा जीव धोक्मयात घालत आहात. जे येथून जाणार नाहीत त्यांना दहशतवादी समजले जाईल आणि त्यांना संपवले जाईल. या कारवाईत सर्वसामान्यांचे प्राण जाऊ नयेत, असे लष्कराला वाटते. अनेक दिवसांपासून आमच्याकडून इशारे दिले जात आहेत, आता हाच अंतिम इशारा मानला पाहिजे, असे रविवारी इस्रायली सैन्याने बजावले.
आम्ही कधीही नागरिकांची हत्या केली नाही. उलट, दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणी आम्ही कारवाई केली आहे, असे नागरिकांच्या हत्येबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांबाबत इस्रायली लष्कराने सांगितले. पॅलेस्टिनींच्या म्हणण्यानुसार, ते दक्षिण गाझाच्या दिशेने जाण्यास कचरत आहेत. कारण तेथे त्यांना ठार मारले जाण्याची भीती आहे. त्यांचे अनेक नातेवाईक उत्तर गाझातून दक्षिण गाझामध्ये गेले होते पण ते सर्व इस्रायली सैन्याने केलेल्या कारवाईत मारले गेल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबरपासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत सुमारे 5,500 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इस्रायलने हमासचा नायनाट करण्याची शपथ घेतली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासचा नाश करणार असल्याचे म्हटले आहे. त्यादृष्टीने हवाई हल्ल्यांबरोबरच सैन्यबळ अधिकाधिक सुसज्ज व मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.









