आज आपण पुन्हा एकदा सायकॉलॉजिकल आजार याबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्याला सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे असे जेव्हा आपल्याला कोणी सांगतं तेव्हा आपल्याला आपण ठार वेडे आहोत असं वाटतं. पण हे खरं नाहीये. आपला मेंदू हा इतका किचकट पद्धतीने बनवलेला आहे की आजतागायत शास्त्रज्ञांना पूर्णत: त्याच्याबद्दल कळलेले नाही. मेंदू कुठल्या गोष्टीचा ताण घेईल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. हा जो ताण आहे तोच आपल्या मेंदूची स्थिती ठरवत असतो.
कुठे वादळ झालं, कुठे दरड कोसळली, पृथ्वी हळूहळू नष्ट होईल ह्या सगळ्या परिस्थिती गंभीर जरी असल्या तरी सगळ्याच व्यक्ती या गोष्टींचा ताण घेत नाहीत. तर आज साधं पाणी आलं नाही, लाईट नाहीये किंवा फ्रिज दुरुस्त करायचा आहे …फ्रिज साफ करायचा राहिलाय या गोष्टींचा ताणसुद्धा काही व्यक्ती घेतात. व्यक्ती तितक्या प्रकृती या जगप्रसिद्ध वाक्याप्रमाणेच व्यक्ती वागतात. कोण, कधी कुठल्या गोष्टीचा ताण घेईल हे आपण सांगू शकत नाही. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा घेतला जाणारा ताण हा आपल्या मानसिक स्थितीवर खूप परिणाम करतो.
आमच्याकडे काही पेशंट येतात जे शारीरिकदृष्ट्या दुखी असतात. पण त्यांना कितीही सेशन दिले गेले तरीसुद्धा त्यात तसूभर बदल होत नाही. तेव्हा मला समजलं की खरा बिघाड त्यांच्या शारीरिक स्थितीत नाही तर मानसिक स्थितीत आहे. अशा पेशंटला जेव्हा आम्ही सांगतो की तुम्हाला सायकॉलॉजिकल हीलिंग घ्यावे लागेल तेव्हा ते पेशंट अवाक होतात…कधी कधी तर चिडतात.
तुम्हाला आम्ही वेडे वाटलो का? माझी बुद्धिमत्ता चांगली आहे. मला सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. मी काही वेडा नाही किंवा मी काही वेडी नाही. अशी अनेक उत्तरं येतात.
तर आज आपण हाच एक गैरसमज दूर करून घेणार आहोत की मानसिक स्थितीत बिघाड होणे म्हणजे वेडं होणे नाही. आजारी असणाऱ्या लोकांचीच मानसिक स्थिती बिघडते किंवा बरी नसते असं काही नसतं. हीलिंग देणारे हिलर्स, डॉक्टर सायकॉलॉजीशी निगडित असलेले डॉक्टर या सगळ्यांवर पण पेशंटच्या समस्या ऐकून ताण येतो. आपली मानसिक स्थिती सुधारण्यासाठी ते सुद्धा प्रयत्नशील असतात. याचा अर्थ ते वेडे आहेत किंवा त्यांच्या मानसिक स्थितीत बिघाड झाला असं होत नाही. आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की आपण जो विचार करतो तसंच होतं असं प्राणिक हीलिंग सांगतं. तुम्ही म्हणाल ताप आहे, ताप आहे, ताप आहे तर ताप येणारच. सिरीयस पेशंटलासुद्धा सांगितलं जातं की तुम्ही मनाची तयारी दाखवा. तुम्ही तुमच्या शरीराला सांगा की तुम्ही बरे होणार आहात, तुम्ही सुदृढ होणार आहात आणि तुमची इच्छाशक्ती तुम्हाला वाचवते.
तुमच्या आजूबाजूला देखील तुम्ही बरीच उदाहरणं अशी बघितली असतील. तर असं का होतं? कारण तुमचा शरीराचा कंट्रोल ज्या मेंदूकडे असतो तो सुस्थितीत असेल तर तुमचं शरीर देखील सुस्थितीतच असणार आहे. चटकन एखाद्या गोष्टीचा राग येणे, एखाद्या गोष्टीचा ताण घेणे, कुठल्याही गोष्टीची काळजी वाटणे ह्या सगळ्या मेंदूशी निगडित समस्या आहेत.
ज्यांच्यावर नीट उपचार घेतले नाही तर कालांतराने खूप गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. कधी कधी जास्त न बोलणे मनात बऱ्याच गोष्टींशी निगडित असलेल्या भावना बरेच विचार तुमची मतंही साठवून ठेवणे, कुणी तुम्हाला दिलेलं दु:ख या सगळ्याचा जो साठा तुम्ही तुमच्या मनात करून ठेवता त्याचासुद्धा गंभीर परिणाम हा तुमच्या शरीरावर होत असतो आणि नंतर एखादा शारीरिक आजार जेव्हा तुम्हाला उद्भवतो तेव्हा तो कितीही गोळ्या घेतल्या, कितीही औषधं खाल्ली, कुठल्याही डॉक्टरकडे गेला तरी बरा होत नाही. याचं कारण असतं की तुम्ही जे विचार तुमच्या मनात साठवता ती जी ऊर्जा आहे ती दूषित आहे आणि ती जोपर्यंत तुमच्यातून बाहेर निघत नाही तोपर्यंत तुमचा आजार बरा होत नाही.
प्राणिक हीलिंग अशाच काही मानसिक आजारांवर उपचार करते.
प्राणिक सायकोथेरपी तुम्हाला नकारात्मक विचार आणि भीती, राग आणि संताप यांसारख्या भावनांना त्वरीत आणि सुरक्षितपणे मुक्त करण्यासदेखील अनुमती देते. जे तुम्हाला तुमची मोठी क्षमता साध्य करण्यापासून मर्यादित करू शकतात. हा कोर्स मन, भौतिक शरीर आणि मानवी ऊर्जा प्रणाली यांच्यातील अंतर कमी करतो, पारंपारिक मानसोपचार उपाय आणि पद्धतींना नवीन आयाम प्रदान करतो.
ही सायको थेरपीची ट्रीटमेंट हीलिंग देणाऱ्या हीलरला सुद्धा घ्यावी लागते. एखाद्या हीलरची मानसिक स्थिती ही चांगली असेल तरच तो त्यांच्या पेशंटनाही योग्य ट्रीटमेंट देऊ शकतो. एखादा हीलर जर पेशंटच्या समस्यांचा ताण घ्यायला लागला तर तो पेशंटला बरं कसं करणार? त्यामुळे सायकोथेरपी घेणं हे काही चुकीचं नाही किंवा सायकोथेरपी घेणं हे ठरवत नाही की तुम्ही वेडे आहात. सध्या माणसांचं कामाचं स्वरूप पाहता त्यांना कामाचा प्रवासाचा इतका ताण येतो की एक सुट्टीचा रविवारसुद्धा त्या माणसांना पुरत नाही. असं का होतं कारण आठवड्यातले सहा दिवस तुम्ही मेंदूवर ताण देता आणि तो कमी करायला रविवारचा दिवस झोपण्याव्यतिरिक्त काहीच करत नाही. मग काय केलं पाहिजे ताण कमी करण्यासाठी…
तर तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टी करा. संगीत ऐका, व्यायाम करा, फिरायला जा, गप्पा मारा, मित्रांसोबत वेळ घालवा, घरच्यांसोबत वेळ घालवा कुठल्याही डॉक्टरला पैसे न देता आपली मानसिक स्थिती जाग्यावर आणण्याचा हा सोपा उपाय आहे.
त्यातूनही जर तुमचा ताण कमी झाला नाही तर चांगल्या डॉक्टरला संपर्क करा तो सांगेल ते प्रामाणिकपणे फॉलो करा. सध्याच्या युगात आपली मानसिक स्थिती चांगली ठेवणं हे फार गरजेचे आहे. कोरोनाच्या काळात काही माणसं गेली ती सगळ्यात जास्त घाबरून गेली. ही परिस्थिती सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यावेळी जर त्यांची मानसिक स्थिती चांगली असती, इच्छाशक्ती प्रबळ असती तर कदाचित त्यातले बरेचसे लोक वाचले असते.
चिंता यासारख्या विविध भावनिक आणि मानसिक समस्यांपासून ते उदासीनता, फोबिया आणि व्यसनाधीनता यासारख्या गंभीर मानसिक विकारांशी झुंजत आहेत. प्राणिक सायकोथेरपी ही मनोवैज्ञानिक आजारांवर उपचार करणारी एक क्रांती आहे कारण ती आपल्या प्रणालीतून नकारात्मक विचार आणि भावना काढून टाकण्यासाठी व्यावहारिक स्पष्टीकरण आणि तंत्रांचा परिचय देते, ज्यामुळे आपले आरोग्य सुधारते.
मानसिक आजार हे मूलत: नकारात्मक विचार, भावना आणि आघातजन्य अनुभवांच्या संचयाचे परिणाम असतात, जे औरस आणि चक्रांमध्ये असतात. अशा ऊर्जा सोडण्यासाठी सामान्यत: काही महिने किंवा वर्षे पारंपारिक मानसोपचार सल्लामसलत सत्रांची आवश्यकता असते, तर प्राणिक मानसोपचार तंत्राने तुम्ही सुरक्षितपणे आणि त्वरीत त्यांना तुमच्या सिस्टममधून तसेच इतरांमधून काढून टाकू शकता. परिणाम शांततापूर्ण भावना, सुसंवाद संबंध, सकारात्मक विचार पद्धती आणि चांगला आत्मसन्मान असेल.
-आज्ञा कोयंडे








