बरोबर 76 वर्षांपूर्वी भारताचा भाग्यविधाता बनून आलेल्या नेतृत्वाने आपला नियतीशी झालेला करार रात्री बाराच्या प्रहरात आठवून भारत नावाच्या देशाची नव्याने सुरू होणारी वाटचाल अधोरेखित केली होती. कोट्यावधी उत्साही मनांच्या साक्षीने! जगातल्या भल्याभल्या विद्वानांनी आणि राजकारणातील तज्ञांनी इथल्या भुकेल्या, अशिक्षितांकडून ही व्यवस्था लवकरच उध्वस्त होईल आणि पुन्हा एकदा भारतात मध्ययुगासारखी परिस्थिती निर्माण होईल असे भाकीत केले होते. त्या भाकिताला भारताने मूठमाती दिली. आम्ही भारतातील लोकांनी आमच्यातील अस्पृश्य समजला गेलेल्या व्यक्तीला नेतृत्व देऊन या देशाची जगात वंदनीय अशी घटना निर्माण केली आणि ती स्वत: प्रतिच समर्पित करुन त्याप्रमाणे आजपर्यंत वागत आलो. त्यामुळेच आमच्या टाळूवर कोणी हुकूमशहा नाचू शकला नाही की आम्ही कुणाचे गुलाम झालो नाही. बंदुकीच्या जोरावर आमची व्यवस्था मोडून टाकण्याचा प्रयत्नसुद्धा अनेकदा झाला. आमच्या भुकेकंगालपणाकडे बोट दाखवून लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्यास प्रेरित केले गेले. पण स्वातंत्र्यासाठी उचललेल्या बंदुका आम्ही कायमच्या खाली ठेवल्या आणि आपला देश सावरण्यासाठी नांगर हाती धरून झटलो. फाळणीच्या तीव्र वेदनांनी आणि त्यावेळी दोन्हीबाजूने झालेल्या रक्तरंजित कारनाम्यांनी आमच्या मनात धार्मिक कटुता निर्माण झाली. सख्खे शेजारी असून आम्ही पक्क्या वैऱ्यासारखी 76 वर्षे काढली. एकमेकाची उणीदुणी काढली. आजही काढत आहोत. आमच्यातील एकता आणि अखंडतेला आम्ही नेहमीच कुरवाळले. पण उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य असे असंख्य भेद आमच्यात वेळोवेळी उचंबळून आले. तरीही आम्ही आमच्या परिस्थितीला विसरलो नाही. आम्ही धरणे बांधण्याची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवली. आम्ही सरकारी आणि खाजगी मालकीचेही कारखाने उभे केले, त्यात राबलो. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली असे आम्ही म्हणत राहिलो पण आमच्या चंद्रमौळी झोपडीला आम्ही निक्रियतेची जळमटं चढू दिली नाहीत. अगदी चीनच्या युद्धाने आम्ही बुजलो नाही आणि पाकिस्तानचे तुकडे केले म्हणून फुगलो नाही. युद्धावर सैनिक लढत असताना आम्ही आमच्या नेत्याचे ऐकून आपापल्या क्षेत्रातील उत्पादन वाढवून आपल्या वाट्याची लढाई लढलो. यशस्वी झालो. देशात तांदळाची टंचाई आहे, एक दिवस उपवास करा हे सांगणं ऐकून उपवास तर केलाच पण त्यातून आम्ही हरित क्रांती साधली. आम्ही धवल क्रांतीही केली. जेव्हा जंगलतोड व्हायला लागली तेव्हा आम्ही चिपको आंदोलनही केले. आम्ही दुष्काळ सोसले. रोजगार हमीच्या कामावर राबलो पण जगलो. ज्वारी खाल्ली आणि तांबडा गहूसुद्धा पचवला. सुकडी अनुभवली आणि पुढच्या पिढ्यांना तिचे कौतुकही सांगितले. त्यातून बोध घेऊन आम्ही आमची शेती सुधारली. या शेतीच्या जोरावर एका पिढीला साक्षर केले. त्यांनी जगाच्या दरवाजावर आपले कौशल्य ठोठावले. कोणी खेळाडू म्हणून गाजले तर कोणी शास्त्रज्ञ झाले. कुणी दूरच्या जगावर आपल्या कार्याचे ठसे उमटवले. आम्ही प्रगती करू लागलो. विकसनशील देशांमध्ये आम्ही जगाच्या पुढे होतो. जगातल्या दु:खिताला आम्ही आपलेसे केले होतेच पण जगाच्या सुखदु:खाचे आम्ही भागीदार बनत गेलो. इतरांच्या संकटात धावून गेलो आणि मित्र देशांच्या मदतीने आम्ही आमची वैज्ञानिक प्रगती साधू लागलो. आम्ही कुणाच्या ताटाखालचे मांजर बनलो नाही आणि उगाचच कुणालातरी गुरगुरुन हैराणही केले नाही. पण तरीही अनेकदा आमच्यावर शेजाऱ्यांनी युद्धे लादली. आम्ही त्याचा कडवा विरोध केला आणि यश खेचून आणले. देशात लोकशाही राहावी या ग्रहाखातीर आणीबाणीला विरोध केला. देश चालवतील अशी खात्री वाटली त्यांच्याच हाती तो सोपवला. कधी निर्णय चुकला तर चुकीची दुरुस्ती केली तर कधी भरभरून यश पदरात टाकले. शैक्षणिक क्रांतीला आम्ही सामोरे गेलो आणि विज्ञान, तंत्रज्ञानाचीही कास धरली. मंडलच्या आगीत जळलो आणि कमंडलाच्या राजकारणातही बुडून गेलो. आर्थिक अरिष्ठाला सामोरे गेलो आणि मिश्र अर्थव्यवस्थेतून मुक्त अर्थव्यवस्थेपर्यंत आम्ही पोहोचलो. त्यालाही आता तीन दशकं उलटली. मध्यमवर्गीय ते नवश्रीमंत अशा प्रवासात आम्ही स्वत:ला बदलले. आमच्यातील काही मात्र अजूनही 1947 च्या फाळणीत अडकले आहेत. आजही त्यांच्या हट्टाचे आम्ही बळी ठरतो. आजही इतिहास आपल्या मढ्यांना उकरून भांडून बघतो. आमचा इतिहास आमची पाठ सोडत नाही. कोणी म्हणतो इतिहास विसरला तो वर्तमान घडवू शकत नाही. पण चांगल्या इतिहासाचा आम्हाला बऱ्याचदा विसर पडतो आणि वाईट इतिहास उगाळला जातो. पण, याच्या पलीकडेही एक जग आहे हे आमच्या तान्हुल्यांनी आता जाणलेले आहे. त्यांना ते पलीकडचे जग खुणावते आहे. त्यांच्या डोळ्यासमोर आदर्श आहेत. पण, त्यांना एकच एक नायक नको आहे. त्यांच्या चित्रपटातील नायकसुद्धा पूर्वीसारखा प्रदीर्घकाळ पडद्यावर टिकत नाही. कोणा एकाचे या पिढीला पटत नाही. कुणी म्हणतात, जगात अशी स्थित्यंतरे येत असतात. नवे विचार देशाला पुढे नेत असतात. नेईल ही नवी पिढी या देशाला यशाच्या शिखरावर. पण आम्हाला खात्री आहे, हे आमचं रक्त विसरणार नाही आमची विश्वबंधुत्वाची संकल्पना. ज्याचा आम्हाला वारंवार विसर पडला! त्या विचारांना ते आपल्या परीने जपतील, आपल्या परीने त्या विचारात मोलाची भर घालतील. या पिढीच्या कर्तृत्वाला पुढची दोन दशकं साद घालतील. जगाची कवाडं यांच्यासाठी सदैव उघडी असतील. जगाला गरज आहे या तरुण रक्ताची. इथे असेल बेरोजगारी पण जगात त्यांना किंमत आहे. इथली शक्ती इथे वापरात येत नाही याची चिंता ते दूर करतील. दूर बसून इथली व्यवस्था चालवतील किंवा इथे बसून दूरचे जग हाताळतील. हा बदल आहे तंत्रज्ञानाचा. पण त्यांचे अधिष्ठान असेल भारतीय विचारांचे. एकमेकाला समजून घेणाऱ्यांचे, दुसऱ्याच्या सुखात सुख शोधून आनंदी राहण्याचे. दैन्य, दारिद्र्यावर आपण मात केली, तशीच वाईट विचारावरही करू…. भारतीय आहोत, भारत हे नाव उज्वल करू. आज होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने याच सदिच्छा.
Previous Articleभूस्खलन घटनांनी हिमाचलमध्ये हाहाकार
Next Article अदानी पोर्टसचा समभाग घसरणीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








