नुकताच उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक शहर प्रयागराज येथील त्रिवेणी संगम स्थानावर महाकुंभमेळा पार पडला आहे. या महाकुंभमेळ्यात कोट्यावधी भाविकांनी संगम स्नानाचा लाभ घेतला आहे. महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन पवित्र स्नान करणे हे पुण्यकर्म मानले गेले आहे. भारतातून, तसेच भारबाहेरुन साधारणपणे 67 कोटी हिंदू या महापर्वणीत समाविष्ट झाले. तथापि, महाकुंभमेळ्यामुळे गरीब लोकांच्या आर्थिक समस्या सुटतील काय, असा टीकात्मक प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे मिळावे, अशी स्थिती प्राप्त झाली आहे. या महाकुंभ पर्वणीचा लाभ होऊन अनेकांची गरीबी दूर झाली आहे.
भाविकांना संगमस्थानापर्यंत नेणारे नावाडी तसेच वाहनचालक यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झाला, हे सर्वांना माहीत आहेच. तथापि, आणखी एका मार्गाने ही महापर्वणी गोरगरीबांसाठी लाभदायक ठरत आहे. हिंदू संस्कृतीत नदीच्या दर्शनानंतर तिच्यात नाणी अर्पण करण्याची प्रथा आहे. या प्रथेचे पालन महाकुंभमेळ्यासाठी तीर्थक्षेत्री आलेल्या कोट्यावधी भाविकांनी केले. त्यामुळे त्रिवेणी संगम आणि गंगा नदीला नाणीच नाणी अर्पण केली गेली. ही नाणी बाहेर काढण्याचे अभियान आज अनेक तरुणांनी चालविले आहे. गंगेच्या पाण्यात लोहचुंबक टाकून तो काढून घेतला असता, त्याला पाण्यातील नाणी चिकटून बाहेर पडत आहेत. ही नाणी हे युवक घेत आहेत. एकेक युवक प्रतिदिन शंभर शंभर वेळा हा लोहचुंबकाचा प्रयोग करीत आहे. अशा पद्धतीने अनेक गरीब युवकांनी थोडेसे धाडस आणि कल्पकता यांच्या आधारावर हजारो रुपये कमावले आहेत.
प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर स्नान केल्यानंतर भाविकांनी तेथे गंगार्पण केलेली नाणी नदीच्या पात्रातून वहात जाऊन पार बिहारपेक्षाही पुढे पोहचली आहेत. त्यामुळे अनेक स्थानी गंगा नदीत लोहचुंबक टाकून त्याला चिकटलेली नाणी हस्तगत केली जात आहेत. केवळ नाणीच नव्हे, तर काही भाग्यवान युवकांना सोन्याची आभूषणे किंवा सोन्याच्या नाण्यांची ही प्राप्ती झाली आहे. त्यामुळे महाकुंभमेळे साजरे करुन गरीबांचे प्रश्न सुटतात काय, असा प्रश्न विचारणाऱ्यांना हे चपखल उत्तर परस्परच मिळत आहे. हा जणू ‘देवाघरचा न्याय’ मानला जात आहे. असंख्य युवकांकडून या गंगार्पण करण्यात आलेल्या नाण्यांचा सदुपयोग त्यांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे भाविकांची पुण्यप्राप्ती आणि गरीबांना अर्थसाहाय्य अशा दोन्ही अर्थांनी सार्थ झाला आहे.









