वृत्तसंस्था / अंकारा
तुर्कस्थान या देशाने भारताशी झालेल्या सशस्त्र संघर्षात पाकिस्तानची बाजू घेतली आहे. तथापि, या देशाचा हा जुगार फसला आहे. या देशाने पाकिस्ताला आपली सर्वात आधुनिक ड्रोन्स पुरविली होती. या ड्रोन्सचा भारताच्या ‘आकाशतीर’ या स्वदेशी रडार प्रणालीने अक्षरश: धुव्वा उडविला. पाकिस्तानने भारतावर तुर्की बनावटीची 500 हून अधिक ड्रोन्स सोडली. पण एकही लक्ष्यावर आदळले नाही. हवेतच त्यांचा चुराडा झाला. हा केवळ तुर्कस्थानला धक्का आहे असे नव्हे. तर हा त्या देशाचे सर्वेसर्वा रेसिप तायीप एर्डोगन यांना व्यक्तीगत हादराही आहे.
तुर्कस्थानने पाकिस्तानला पुरविलेली ड्रोन्स ‘बैकारखतार’ या प्रकारची होती. या ड्रोन्सची निर्मिती एर्डोगन यांच्या जावयाच्या कंपनीकडून केली जाते. यापूर्वीच्या काही संघर्षांमध्ये या ड्रोन्सचा प्रभावी उपयोग झाला होता. नोबोर्नो कारावाख आणि रशिया-युक्रेन युद्धात केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे या ड्रोन्सचा बोलबाला जगात झाला होता. आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आशिया या खंडांमधील अनेक देशांनी या ड्रोन्ससाठी मागण्या नोंदविल्या होत्या. ही ड्रोन्स तुर्कस्थानच्या संरक्षण व्यवस्थेचा मुकुटमणी म्हणून प्रसिद्ध झालेली होती. त्यामुळे हा देश आंतरराष्ट्रीय ड्रोन बाजारपेठेत महत्वाचे स्थान पटकावेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. एर्डोगन यांनी या ड्रोन्सना इस्लामी रंगही चढविला होता. या ड्रोन्सची निर्मिती इस्लामच्या सामर्थ्याचे प्रतिक आहे, असे ते अनेकदा गर्वाने बोलले होते.
गर्वाचे घर खाली
तथापि, फारसा बोलबाला न झालेल्या भारताच्या स्वदेशनिर्मित आकाशतीर प्रणालीने एर्डोगन यांच्या गर्वाचे घर खाली केले आहे. या देशाचे एकही ड्रोन भारताच्या भूमीवर आदळू शकले नाही. 500 हून अधिक ड्रोन्सचा नाश झाल्यानंतर पाकिस्तानला त्यांचा मारा थांबवाला लागला. त्याचसमवेत ड्रोन्सचा जागतिक सम्राट बनण्याचे एर्डोगन यांची स्वप्नही धाराशायी झाले आहे. त्यांच्या जावयाच्या कंपनीची आता कोंडी झाली आहे. तुर्कस्थानची गुर्मी चांगलीच उतरली आहे. आपल्या जावयाची ग्राहके वाचविण्याचे आव्हान आता एर्डोगन यांच्यासमोर आहे. भारताने केवळ तुर्कस्थानच्या सामरिक महत्वाकांक्षेलाच अक्षरश: आस्मान दाखविले असे नव्हे, तर तुर्कस्थानच्या संरक्षण सिद्धतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. तसेच एर्डोगन यांना हा व्यक्तीगत आणि कौटुंबिक धक्काही आहे. अशा प्रकारे भारताच्या ‘स्वदेशी’ने एकाच दगडात तुर्कस्थानचे अनेक पक्षी मारले आहेत, हे ‘सिंदूर’ अभियानाच्या यशाने साऱ्या जगाला दर्शवून दिले आहे.









