पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवसांची कपात
पणजी : एका बाजूने अन्य राज्यात विधानसभा कामकाजाचे दिवस कमी होत चालले असताना गोव्यात मात्र 40 दिवसांचे कामकाज चालते, असे वक्तव्य लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी करून 24 तास सुद्धा उलटले नाहीत तोच येत्या पावसाळी अधिवेशनाचे दोन दिवस कमी करून भाजप सरकारने लोकशाहीची थट्टा केली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. गुऊवारी गोवा भेटीवर आलेले लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी गोव्यात 40 दिवसांचे कामकाज चालत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले होते. परंतु लगेच दुसऱ्याच दिवशी 20 दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचे दोन दिवस कमी करून ते 18 वर आणण्यात आले, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. अशाप्रकारे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचे प्रकार गोव्यात वारंवार का घडत आहेत? असा सवाल सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे. गोवा हे लहान राज्य असल्यामुळे लोकांचे प्रश्नही अल्पच आहेत, असे या सरकारला वाटते का? किंवा हे सरकार लोकांना मूर्ख समजत आहे का? सक्षम लोकशाहीसाठी सक्षम विरोधक असणे आवश्यक असते. अशावेळी विरोधकांना चर्चेसाठी कमी दिवस देणे म्हणजे विरोधकांवर अन्याय करण्यासारखे आहे, असे सरदेसाई यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.









