राज्यातील सध्याचे राजकारण किळसवाण असून सर्वसामान्य नागरिकांना संकटात टाकणार आहे. राजकारणात सर्वांनीच ताळतंत्र सोडला असून महाराष्ट्राची संस्कृती अशी अजिबात नव्हती असा उद्गार शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते माजी आमदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार यांची राजकारण जी प्रतिमा तयार झाली आहे तीच त्यांना त्रासदायक ठरत असल्याचेही राजू शेट्टी यांनी नमूद केले.
पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “सध्या विरोध करण्यासाठी दुसऱ्याच्या चुलीपर्यंत जाण्याची मजल झाली आहे. विरोध म्हणून घोट्याच्या खाली वार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काल जो वाईट होता तो आज चांगला आहे.” असे म्हणून सामान्य माणसाला तुम्ही मूर्ख समजता का? असा प्रश्न राजकारण्यांना त्यांनी विचारला.
तसेच “अजून महाराष्ट्रात पुरेसा पाऊस नाही. पुढील पंधरा दिवस अशीच परिस्थिती राहिली की महाराष्ट्रात दुबार पेरणीचे संकट येईल. मात्र याची चिंता कोणत्याच राज्यकर्त्याला नाही. कोण शपथ घेतो तर कोणाला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चिंता कोणालाच नाही. शेतकरी अडचणीत असताना आज त्याची कोणालातरी आठवण येते का?” असाही प्रश्न त्यांनी विचारला.
राष्ट्रवादीच्या फुटीवर भाष्य करताना राजू शेट्टी यांनी शरद पवारांची प्रतिमाच त्यांना त्रासदायक ठरत असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “शरद पवार उजव्या हाताने जे करतात ते डाव्या हातालाही कळत नाही, अशी राजकारण करण्याची त्यांची परंपरा आहे. त्यांची हीच प्रतिमा आज राजकारणात त्रासदायक ठरत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची छोटीशी होडी देखील अनेकांनी फोडण्याचा प्रयत्न केला. जे स्वाभिमानी पासून बाजूला गेलेत ते आता बाजूला फेकले गेले आहेत आणि पाण्यात गटांगळ्या खात आहेत. स्वाभिमानीची होडी ही कधीही ध्येयापासून भरकटलेली नाही. त्यामुळे अशा वादळाची, पुराची कशाचीही भीती स्वाभिमानीला नसून जीव धोक्यात घालून आम्ही होडीत बसलो आहे त्यामुळे जीवाचीही आम्हाला पर्वा नाही” असेही त्यांनी म्हटले आहे.








