पालकमंत्री सतीश जारकीहोळी : भाजपवर हल्लाबोल
बेळगाव : गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच गॅरंटी योजनांची समर्पकपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. याद्वारे बोले तैसा चाले, असे काँग्रेस पक्षाने दाखवून दिले आहे. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजप सरकारकडून केवळ खोटी आश्वासने दिली आहेत. जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. ही निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी आहे. मतदारांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. गोकाक येथील वाल्मिकी मैदानावर आयोजित प्रजाध्वनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेस उमेदवारांना मतदारांनी सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस पक्षाने दिलेले वचन पाळले आहे. त्यामुळे मतदान मागण्याचा नैतिक अधिकार आहे. दिलेली आश्वासने पाळली आहेत. याची जाणिव ठेवून मतदारांनी पक्षाला पाठिंबा द्यावा, असे त्यांनी सांगितले. भाजपने 2014 च्या निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे मतदारांनी खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकविला पाहिजे. विकासकामांचा केवळ बोलबाला केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र कोणतीच कृती नाही. बुलेट ट्रेन, नदीजोड प्रकल्प कागदावरच राहिले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. दोन कोटी रोजगार देण्याची हमी केवळ स्वप्न आहे. बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून महागाईचा चटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडल्याने भाजप सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. यासाठी सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या काँग्रेस पक्षाला पाठिंबा देऊन सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.









