फिलिपाईन्स या देशात वास्तव्यास असणाऱ्या रुबेन एनजे नामक व्यक्तीची ही कथा आहे. या व्यक्तीने स्वत:ला 36 वेळा सुळावर लटकवून घेतलेले आहे. तरीही तो जिवंत आहे. कारण त्याचे हे सुळावर लटकणे प्रतिकात्मक असते. पण या प्रतिकात्मक कृतीलाही एक आगळे वेगळे महत्व आहे. कारण ख्रिश्चन धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त याला त्यावेळच्या राजसत्तेने सुळावर चढविले होते. हा प्रसंग प्रत्येक ख्रिश्चन भाविकासाठी अत्यंत दु:खद असतो. येशू ख्रिस्ताने मानवतेसाठी केलेल्या त्यागाची स्मृती जपण्यासाठी एनजे हे प्रतिवर्ष स्वत:ला सुळावर लटकवून घेत असतात. गेली 36 वर्षे त्यांचा हा उपक्रम त्यांची चालविला आहे.
येशू ख्रिस्ताला ज्या प्रकारे सुळी देण्यात आले, तशा प्रकारचे दृष्यही एनजे यांच्या सुळावर चढण्याच्या उपक्रमाच्या वेळी निर्माण केले जाते. एनजे यांना वधस्तंभाकडे घेऊन जाण्यासाठी रोमन सैनिकांच्या वेषभूषेत काही लोकही असतात. ते एनजे यांना शिक्षा ठोठावली गेल्यानंतर त्यांना घेऊन वधस्तंभाकडे जातात. नंतर एनजे यांना येशू ख्रिस्ताप्रमाणे सुळावर लटकविण्यात येते. त्याआधी राजदरबारात एनजे यांना सुळावर लटकविण्याची शिक्षा ठोठावण्याचे दृष्यही निर्माण करण्यात येते. हा उपक्रम ते प्रत्येक वर्षी गुडफ्रायडेच्या दिवशी चालविताना दिसतात. सुळावर चढविताना एनजे यांची वेषभूषाही येशू ख्रिस्ताप्रमाणेच केलेली असते. त्यांना काट्याचा मुकूट घातला जातो. आज एनजे यांचे वय बरेच जास्त आहे. तथापि, तरीही त्यांनी हा उपक्रम चालविला आहे. त्यांच्या गावाची ही परंपरा आहे.









