शहराबाहेर रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक : शहरातील मंगल कार्यालयांजवळ पार्किंगचा प्रश्न गंभीर
बेळगाव : लग्नसराई आणि यात्रा-जत्रांमुळे शहर आणि शहराबाहेरील रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. रविवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने गांधीनगरजवळील सर्व्हिस रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. यातून बाहेर पडताना वाहनधारकांची चांगलीच दमछाक झाली. परिणामी वऱ्हाडी मंडळींना वेळेत अक्षतांना पोहोचण्यासाठी धडपड करावी लागली. शहरात वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, सार्वजनिक वाहतुकीचे देखील तीनतेरा वाजू लागले आहेत. त्यातच लग्न आणि यात्रांचा हंगाम सुरू झाल्याने शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. सध्या लग्नसराई जोरात सुरू असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. विशेषत: दुचाकी, चारचाकी आणि वऱ्हाडी मंडळींची वाहतूक करणारी वाहने यामुळे शहराबाहेरील रस्त्यावर वाहनांचा ताण वाढला आहे. दरम्यान, काही ठिकाणी विकासकामेदेखील सुरू आहेत. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ लागली आहे. शहरातील मंगल कार्यालयांजवळ पार्किंगचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याबरोबर अरुंद रस्त्यावरच वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. लग्नाचा धुमधडाकाही सुरू असल्याने वाहनांची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ लागली आहे.









