एक माणूस कोणत्याही साधनाचे साहाय्य न घेता, एकाचवेळी दोन हातांनी मोठे पेले किंवा ग्लास (बियर पिण्यासाठी उपयोगात आणतात ते) किती संख्येने उचलू शकेल, असा प्रश्न विचारल्यास आपले उत्तर चार ते सहा असे असण्याची शक्यता आहे. सध्या एक व्हिडीओ प्रसिद्ध केला जात आहे, ज्यात एक वेटर महिला एकाचवेळी दोन हातांनी बियरचे तब्बल 13 पेले उचलताना दिसून येते. हे पेले बियरने भरलेले आहेत आणि ही वेटर ते ग्राहकांना सर्व्ह करताना पहावयास मिळते. हा बार अमेरिकेतील असून वेटरचे नाव मात्र गुलदस्त्यात आहे.
या महिला वेटरच्या या कौशल्यामुळे तिचे कौतुक केले जाते. कारण ती अत्यंत कमी वेळेत बऱ्याच ग्राहकांना बियर किंवा इतर पेये पुरवू शकते. बियरने भरलेले 13 ग्लास एकाच वेळी उचलणे आणि पेयाचा थेंबही या ग्लासांमधून बाहेर येऊ न देता ते ग्राहकांना सर्व्ह करणे तसे सोपे नाही. पण या महिलेने ते कौशल्य साध्य केले असून या बारमध्ये तिचे हे कौशल्य पाहण्यासाठी कित्येक ग्राहक येतात असे बोलले जाते. बियरने भरलेल्या 13 पेल्यांचे वजन बरेच जास्त असते. तथापि, शरीराने धडधाकट असलेली ही महिला हे काम लीलया करते असे दिसून येते. त्यामुळे या व्हिडीओला हजारोंच्या संख्येने लाईक्स मिळालेले आहेत.









