तळीरामांनी रिचवले 3 कोटीहून अधिकचे मद्य
बेळगाव : पावसाअभावी बेळगावसह संपूर्ण राज्यात दुष्काळ आहे. सरकारने बेळगाव जिल्ह्यातील बहुतेक तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. तरीही थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या पार्टीत दारू भरभरून ढोसली गेली. केवळ एका बेळगाव दक्षिण जिल्ह्यातील सात तालुक्यात रविवारी एका दिवसात 6,983 बॉक्स दारू खपली आहे. अबकारी कार्यालयाचे विभाजन झाल्यानंतर बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती व गोकाक तालुके मिळून दक्षिण जिल्हा बनविण्यात आला आहे. केवळ या सात तालुक्यांमध्ये एका रात्रीत 2 कोटी 90 लाख 87 हजार रुपये किमतीची व्हिस्की व रम खपली आहे. तर एका रात्रीत 3 हजार 151 बॉक्स बियर रिचविण्यात आली आहे. या बियरची किंमत 57 लाख 85 हजार रुपये होते. एका बेळगाव तालुक्यातच बेळगाव रेंज-1, 2, 3 व बेळगाव-1 व 2 असे पाच विभाग कार्यरत आहेत. रेंज 1 मध्ये 869.33 बॉक्स, रेंज 2 मध्ये 803.85 बॉक्स, खानापूर तालुक्यात 389.26 बॉक्स, बेळगाव-1 मध्ये 2062 बॉक्स, बैलहोंगलमध्ये 1292 बॉक्स, बेळगाव रेंज 3 मध्ये 580 बॉक्स, बेळगाव-2 मध्ये 1872 बॉक्स, रामदुर्गमध्ये 1354.22 बॉक्स, सौंदत्तीमध्ये 1694.84 बॉक्स तर गोकाकमध्ये 3049 बॉक्स मद्य खपले आहे.
टार्गेटपेक्षा अधिक विक्री
अबकारी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केवळ थर्टी फर्स्ट डिसेंबर रोजी 2 कोटी 90 लाख 87 हजाराचे मद्य व 57 लाख 85 हजाराची बियर संपविण्यात आली आहे. केवळ एका दिवसाची ही आकडेवारी आहे. दरवर्षी अबकारी विभागाला मद्य खपविण्याचे टार्गेट दिले जाते. सरकारने निश्चित केलेल्या टार्गेटपेक्षा अधिक मद्य खपते.









