वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकेचा फलंदाज आणि कसोटीवीर लाहिरु थिरिमनेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या 13 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला त्याने निरोप दिला आहे.
शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना थिरिमनेने निवृत्तीची घोषणा जाहीर केली. 33 वर्षीय थिरिमनेने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 197 आंतरराष्ट्रीय सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व करताना 7 शतके आणि 31 अर्धशतकांसह 5573 धावा जमवल्या आहेत. 2010 साली थिरिमनेने आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते. त्याने 44 कसोटी, 127 वनडे व 26 टी-20 सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व केले. त्याने दोन विश्वचषक स्पर्धा तसेच तीन टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत. 2014 साली टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या लंकन संघामध्ये त्याचा समावेश होता. काही सामन्यामध्ये त्याने लंकेचे नेतृत्वही केले आहे. वनडे प्रकारात त्याने 4 शतके तर कसोटीत 3 शतके नोंदवली आहेत. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये बेंगळूर येथे भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत थिरिमनेने लंकेचे प्रतिनिधीत्व केले होते. थिरिमनेचा हा शेवटचा सामना ठरला.









