सांगली :
एस.एस.एस. हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे या सध्याच्या वंदे भारत एक्सप्रेससह लवकरच पुण्याहून मिरजमार्गे बेळगाव ही आणखी एक नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. पुणे जंक्शनवरून पाच नव्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. यात पुणे ते बेळगाव या वंदे भारतचाही समावेश आहे. त्यामुळे सांगली मिरजेतून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी तिसरी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. गाडयांचे वेळापत्रक निश्चित झाले नसले तरी नजिकच्या काळात पाच नव्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
सध्या पुण्यासाठी सांगली मिरजेतून सोमवार वगळता इतर दिवशी दोन वंदे भारत एक्सप्रेस सुटतात. यातील एक वंदे भारत एक्सप्रेस ही एस. एस.एस हुबळी जंक्शनवरून तर दुसरी कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून सुटते. याशिवाय सांगली मिरजेसाठी तिसरी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुणे जंक्शनवरून बेळगाव अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. ती सातारा, सांगली व मिरज जंक्शन अशा तीनच स्टेशनवरती थांबणार आहे.
पुणे जंक्शनवरून नव्या पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. यात पुणे ते शेगाव ही व्हाया दौंड जंक्शन, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या मार्गे शेगावला जाईल. दुसरी वंदे भारत ही पुणे ते वडोदरा या मार्गावर सुरू होत असून ती लोणावळा, पनवेल, वापी, सुरत या मार्गे वडोदराला जाणार आहे. पुणे ते सिंकदराबाद या मार्गावर पुण्याहून सुरू होणारी तिसरी नवी वंदे भारत दौंड, सोलापूर, कलबुर्गी या मार्गाने जाणार आहे. याशिवाय पुणे ते नागपुर या मार्गावर प्रथमच स्लीपर कोच या प्रकारातील वंदे भारत सुरू करण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे. सर्व पाचही नव्या वंदे भारत लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
पुणे जंक्शनवरून सुरु होणाऱ्या नव्या पाच वंदे भारत पैकी मिरज मार्गावरील नव्या पुणे ते बेळगाव या वंदे भारत एक्सप्रेसला केवळ तीनच थांबे मिळणार आहेत. यात पुण्याहून सुटल्यानंतर ही गाडी सातारा, सांगली व मिरज अशा तीनच ठिकाणी थांबणार आहे. त्यामुळे ही गाडी कमी कालावधीत बेळगांवला पोहचणार आहे.







