19 वषीय अंकितने जवळून झाडल्या होत्या गोळय़ा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणारा तिसरा शार्पशूटर अंकित सेरसा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तो हरियाणाचा रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रविवारी रात्री दिल्लीतील कश्मिरी गेट येथून त्याला ताब्यात घेतले. खुनाच्या वेळी 19 वषीय अंकित सेरसा याने मुसेवाला यांच्या दोन्ही हातांवर बंदुकीतून गोळय़ा झाडल्या. हत्येच्या वेळी तो मुसेवालाच्या सर्वात जवळ होता.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर शार्पशूटर अंकितची बचावासाठी जोरदार धावपळ सुरू होती. गेल्या तीस-पस्तीस दिवसात तो एका दिवसापेक्षा जास्त काळ कुठेही थांबलेला नाही. वेगवेगळय़ा पाच राज्यात त्याने प्रवास केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रवासादरम्यान फतेहाबाद, तोशाम, पिलानी, कच्छ, मध्यप्रदेश, विलासपूर, उत्तर प्रदेश, झारखंड येथे राहिल्याची कबुली त्याने दिली. याशिवाय दिल्ली-एनसीआर आणि हरियाणामध्येही तो पोहोचला होता. तसेच आपण 2 ते 7 जून या कालावधीत गुजरातमधील कच्छमध्ये राहिलो होतो, असे अंकित सेरसा याने दिल्ली पोलिसांना सांगितले.









