प्रतिनिधी/ बेंगळूर
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारने इयत्तानिहाय दप्तराचे ओझे किती असावे, यासंबंधी मर्यादा घातल्या आहेत. यापाठोपाठ आणि प्रत्येक महिन्यातील तिसऱ्या शनिवारी ‘बॅगलेस डे’ निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूरक उपक्रम राबवून उत्सवी वातावरण निर्माण करण्याची सूचना शिक्षण खात्याने दिली आहे.
राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण विभागाने 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रत्येक महिन्याचा तिसरा शनिवारी शालेय पातळीवर उपक्रम राबविण्याची सूचना दिली आहे. या दिवशी जिल्हा, ब्लॉकसह विविध स्तरावरील अधिकाऱ्यांनी शाळांना आवजून भेट देऊन मार्गदर्शन करावे. तसेच शनिवारी घेतलेल्या उपक्रमांची माहिती जमा करून अहवाल सादर करण्याची सूचना डीएसईआरटीच्या संचालक व्ही. सुमंगला यांनी दिली आहे.









