जिल्हा पंचायतला सरकारचा आदेश : अधिकाऱ्यांना सहकार्याचे आवाहन
बेळगाव : ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत योजना राबविण्यात आली आहे. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून योजना राबविताना कामाचा दर्जा राखण्यात आला नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जलजीवन मिशन योजनेतील कामांच्या तपासणीचा आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्येही या योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या कामांचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होणार असल्याचे जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घराला पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या भागीदारीतून योजना राबविण्यात आली आहे. बहुग्राम पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडून निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, योजना राबविताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पंचायतराज खात्याकडून गंभीर दखल
जिल्ह्यामध्ये बहुग्राम पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून जलजीवन मिशनअंतर्गत गावागावांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे. सदर योजना राबविताना घरोघरी नळजोडणी करण्यात आली आहे. या नळजोडणीसाठी वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे ठरले आहे. तसेच पाणीमीटर बसविण्यात आले असून हे मीटरही निरुपयोगी ठरले आहे. पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात आलेल्या जलवाहिन्या निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. यावरूनच या योजनेच्या चौकशीसाठी थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ग्रामीण विकास आणि पंचायतराज खात्याचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी याची गंभीर दखल घेत थर्ड पार्टी इन्स्पेक्शनचा आदेश जारी केला आहे. योजना राबविताना कोणत्या प्रकारचे साहित्य वापरण्यात आले आहे, त्यासाठी असणारी मार्गसूची, पाणीपुरवठ्याचे प्रमाण आदी बाबींचा तपशील घेऊन अहवाल देण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. 60 दिवसांमध्ये याचा अहवाल देण्याचा आदेश पंचायतराज खात्याकडून करण्यात आला आहे. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यामध्येही बहुग्राम पाणीपुरवठा योजनेसह जलजीवन मिशन योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
पाणीपुरवठा योजनांची चौकशी करण्यात येणार
योजना राबविताना वापरलेले साहित्य, मार्गसूची, पाणीपुरवठ्याचे प्रमाण आदी बाबींचा तपशील घेऊन अहवाल देण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. 60 दिवसांमध्ये याचा अहवाल देण्याचा आदेश पंचायतराज खात्याकडून करण्यात आला आहे. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यामध्येही बहुग्राम पाणीपुरवठा योजनेसह जलजीवन मिशन योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे जि. पं. अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.









