तीन दिवसीय बैठकीत महिलांचे विषय केंद्रस्थानी : एकूण 20 देशांचे 72 प्रतिनिधी होणार सहभागी
पणजी : गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या जी 20 शिखर बैठकांमध्ये जागतिक स्तरावरील नेत्यांना एकत्र आणून महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे. आज मंगळवार दि. 9 ते 11 मे पर्यंत परिषदेच्या विकासात्मक कार्यगटाची तिसरी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दोनापावला येथील ताज रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणाऱ्या या बैठकीत जी 20 देशांचे 71 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. डिजिटल तत्त्वे, हरित संक्रमणे आणि आंतरराष्ट्रीय समन्वय आणि भागीदारी वाढवणे यासह शाश्वत विकासाशी संबंधित जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी हे प्रतिनिधी संवाद साधणार आहेत. बैठकीतील प्रमुख विषयांमध्ये शाश्वत विकास उद्दिष्ट्यो (एसडीजी) संबंधीच्या प्रगतीला चालना देण्यासाठी जी 20 ची भूमिका या विषयाचाही समावेश असेल.
बैठकीची सर्व तयारी पूर्ण
या बैठकीच्या आयोजनासाठी विविध आघाड्यांवर तयारी करण्यात आली आहे. या तयारीमध्ये सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असलेला राजशिष्टाचार याबाबतही चोख नियोजन करण्यात आले असून प्रतिनिधींच्या आगमनासाठी विमानतळावर पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
पर्यावरणप्रिय जीवनशैली
शाश्वत विकास उद्दिष्ट्यो (एसडीजी) साध्य करण्यासाठी आपल्या विकासात्मक कामांना कशा प्रकारे चालना देण्याची गरज आहे, याबाबत तिसरा विकासात्मक कार्यगट विचार करत आहे. पर्यावरणप्रिय जीवनशैली विषयक काही उच्च आचरणतत्त्वांसह काही धाडसी, कृतिशील उपाययोजना आखण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच या संक्रमणांना कशा प्रकारे गती देता येईल यावरही बैठकीत ऊहापोह केला जाईल. जग डिजीटल क्रांतीच्या मध्यावर आहे आणि त्यामुळे काही जागतिक पर्यावरणीय उद्दिष्ट्यो व्यापक करण्याबाबतही विचारमंथन होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव के. नागराज नायडू यांनी दिली. नायडू पुढे म्हणाले की, खऱ्या अर्थाने लिंगसमानता आणि महिला सक्षमीकरण साधायचे असेल तर महिलांप्रणीत विकास धोरण अंगीकारण्याची गरज आहे.
महिलांचे नवे नेतृत्व करण्याची गरज : सरन
दरम्यान जी 20 परिषदेच्या तिसऱ्या डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप बैठकीच्या पहिल्या दिवसाची सुऊवात काल सोमवारी भारताच्या जी 20 शिखर परिषदेच्या महिलांच्या नेतृत्वाखाली अभ्यासपूर्ण कार्यक्रमाने झाली. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या भागीदारीत जी20 सचिवालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात ओआरएफच्या अध्यक्षा समीर सरन यांचे प्रमुख भाषण झाले. समीर सरन म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात महिलांचा अधिक समावेश आणि सशक्तीकरण यावरच न थांबता आगामी दशकांमध्ये महिलांचे नवीन नेतृत्व तयार होणे गरजेचे आहे. शिखर परिषदेतील हा कार्यक्रम भविष्यासाठी एकत्रितपणे विचार करण्यासाठी, लोकांना एकत्र आणण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हा कार्यक्रम सक्षम वातावरण तयार करेल.
महिलांच्या विविध विषयांवर चर्चा
बैठकीत महिला आणि अर्थव्यवस्था यावरही चर्चा करताना शिक्षणाचा समान प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी प्रणालींची पुनर्कल्पना आणि डिजिटल कौशल्य विकास, धोरणात्मक दृष्टीकोनातून स्त्रियांवर ठेवलेल्या काळजीच्या कामाचा दुहेरी ओझे सोडवण्याचा मार्ग, अर्थव्यवस्थेत आणि महिलांना भविष्यातील नोकऱ्यांसाठी प्रशिक्षित केले जाईल याची खात्री करण्यासाठी पुन: कौशल्य, अपस्किलिंग आणि क्षमता वाढीसाठी आवश्यक गुंतवणूक यावर चर्चा झाली.
‘युनिफॉर्म्ड सर्व्हिसेसमधील महिला नेतृत्व’
‘युनिफॉर्म्ड सर्व्हिसेसमधील महिला नेतृत्व’ या विषयावरील सत्रात भारतीय नौदलातील महिलांवर चर्चा झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिव एनम गंभीर यांनी समारोपाच्या भाषणात महिलांच्या क्षमता वाढवणे हे संघटनात्मक यश, राष्ट्रीय समृद्धी आणि जीवनाचा दर्जा यावर भाष्य केले. यावेळी नॅसकॉमच्या अध्यक्षा देबजानी घोष, आशियाई विकास बँकेच्या लैंगिक समानता थीमॅटिक ग्रुपच्या प्रमुख समंथा हंग, कार्यकारी संचालक मारिया फर्नांडा एस्पिनोसा गार्सेस, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 73 व्या सत्राच्या माजी अध्यक्षा चारू मल्होत्रा, प्राइमस पार्टनर्सच्या व्यवस्थापकीय संचालक बारातंग मिया, विमेन हू कोड, काजल इल्मी, एविओम इंडिया हाउसिंग फायनान्सच्या संस्थापक तथा संचालक सुरंजली टंडन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसीच्या प्रमुख वेरा हेलेना थॉर्सटेन्सन, भारतीय नौदलाच्या कमांडर शाझिया खान, लेफ्टनंट कमांडर स्वाती भंडारी, लेफ्टनंट कमांडर तविशी सिंग, लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत, लेफ्टनंट कमांडर रूपा आणि लेफ्टनंट कमांडर दिलना उपस्थित होत्या.









