वृत्तसंस्था /कोपनहेगन (डेन्मार्क)
भारत व आयर्लंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी 20 सामना हा अनेक तासांच्या प्रतिक्षेनंतर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयर्लंड क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका ही 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. दरम्यान, टीम इंडियाने सलग 2 सामने जिंकले होते. त्यामुळे तिसरा सामना जिंकून टीम इंडियाला आयर्लंडला 3-0 अशा फरकाने क्लिन स्विप देण्याची संधी होती. मात्र ती संधी पावसाने हिसकावून घेतली. दरम्यान, डब्लिनमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पण दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे नाणेफेकही झाली नाही. पंचांनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ आता 30 ऑगस्टपासून आशिया कप खेळणार आहे. जवळपास सहा महिन्यांनी आशिया कपमध्ये भारताचा संपूर्ण वनडे संघ उतरणार आहे. ही वर्ल्डकपची रंगीत तालीम असून भारताचा पहिलाच सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तासोबत 2 सप्टेंबरला होईल.
बुमराहची अशी अनोखी कामगिरी
जवळपास 11 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेला भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार पटकावताच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. बुमराहने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. आयर्लंड दौऱ्यावर बुमराहने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण केले. तो या क्रिकेट प्रकारात संघाचे नेतृत्व करणारा 11 वा खेळाडू बनला. मात्र, आपल्या नेतृत्वाखाली पहिलीच मालिका जिंकून त्याने विक्रम रचला. तो मालिकावीर पुरस्कार जिंकणारा पाचवा भारतीय कर्णधार बनला आहे. या यादीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारखे दिग्गज खेळाडूही आहेत. सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी आहे. विराटने यापूर्वी 3 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. तसेच, सुरेश रैना, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना प्रत्येकी 1 वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकण्यात यश आले आहे.









