तीन मतदारसंघांमध्ये नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट
प्रतिनिधी/ बेंगळूर
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या 10 उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीतही भाजपने दोन विद्यमान आमदारांना वगळले आहे. तर तीव्र कुतूहल निर्माण झालेल्या हुबळी-धारवाड मतदारसंघातून महेश टेंगिनकाई यांना तिकीट देण्यात आले आहे. कुटुंबातील सदस्यांना तिकीट नाही, असे सांगणाऱ्या भाजपने मात्र, या यादीत तीन मतदारसंघात नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली आहे.
राजकीय निवृत्ती जाहीर केलेल्या माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी आपले पुत्र कांतेश यांना शिमोगा शहर मतदारसंघाची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघाविषयी अद्याप एकमत न झाल्याने शिमोगा शहर मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. तर रायचूर जिल्ह्यातील मान्वी मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यावी, याविषयीही अद्याप निर्णय झालेला नाही. आतापर्यंत भाजपने 222 मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.
तीन मतदारसंघांमध्ये भाजपने राजकारण्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट दिले आहे. बेंगळूरच्या महादेवपूरमध्ये विद्यमान आमदार अरविंद लिंबावळी यांची पतनी मंजुळा लिंबावळी यांना तिकीट दिले आहे. अरविंद लिंबावळी यांना पहिल्या आणा दुसऱ्या उमेदवार यादीत तिकीट जाहीर न झाल्याने त्यांनी अन्य पर्याय निवडण्याचा विचार केला होता. याचा फटका बसू नये याकरिता भाजपने त्यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. बेंगळूरच्याच हेब्बाळमध्ये माजी मंत्री कट्टा सुब्रह्मण्य नायडू यांचे पुत्र कट्टा जगदीश यांना तिकीट दिले आहे. कोप्पळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार करडी संगण्णा यांनीही तिकीट देण्याची मागणी केली होती. तिकीट न मिळाल्यास बंडखोरीचा इशारा दिला सोता. आठवडभराच्या राजकीय नाट्यानंतर भाजपने अखेर करडी संगण्णा यांची सून मंजुळ करडी यांना तिकीट दिले आहे.









