पाच वर्षांनंतर बसस्थानकाचे काम प्रगतिपथावर : लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल : 102 कोटींतून विकास
बेळगाव ; स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या सीबीटी बसस्थानकाच्या तिसऱ्या मजल्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मध्यवर्ती बसस्थानकाचे काम पूर्ण झाल्याने कामगार आता सीबीटी बसस्थानकाच्या कामात गुंतले आहेत. कोरोना, कंत्राटदाराचे दुर्लक्ष आणि इतर अनुदानाचा अभाव यामुळे या कामाला बराच विलंब झाला आहे. मागील चार-पाच वर्षांपासून सुरू असलेले काम अद्याप निम्मे शिल्लक आहे. त्यामुळे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. स्मार्ट सिटीच्या 102 कोटी रुपयांतून या बसस्थानकाचा विकास साधला जात आहे. या बसस्थानकात तळमजल्यात पार्किंग व्यवस्था, विविध कार्यालये आणि बसेस थांबण्यासाठी फलाट उभारले जाणार आहेत. विशेषत: बस ड्रायव्हर आणि कंडक्टरांची सर्व शासकीय कामे या ठिकाणी चालणार आहेत. पास विभाग, विभागीय संचार कार्यालय, विभागीय नियंत्रण कक्ष आदी उभारले जाणार आहेत. त्यामुळे या कार्यालयातूनच विविध बसेसवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. यासाठी विशेष रुमची व्यवस्था केली जात आहे. 2016 मध्ये जुने बसस्थानक हटवून नवीन बसस्थानकाच्या कामाला प्रारंभ झाला. दरम्यान, लोकप्रतिनिधी आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी वर्षभरात बसस्थानक उभारले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात पाच वर्षांनंतरही बसस्थानकाचे काम पूर्ण झाले नाही. कोरोनामुळे बराच काळ कामाला स्थगिती मिळाली होती. परराज्यांतील कामगार मूळ गावी परतल्याने काम थांबले होते. मात्र, मागील वर्षीपासून काम सुरळीत सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात बसस्थानकाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा परिवहनचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. मागील पाच-सहा वर्षांपासून संथगतीने सुरू असलेल्या कामाला आता काहीशी गती प्राप्त झाली आहे. तिसऱ्या मजल्याची स्लॅबभरणी पूर्ण झाली आहे. अंतर्गत बांधकाम सुरू झाले आहे. विविध परिवहनची कार्यालये या ठिकाणी उभारली जाणार आहेत. विशेषत: बेळगावातील चार आणि खानापूर, रामदुर्ग, सौंदत्ती येथील तीन आगारांचा कारभार या कार्यालयातून चालणार आहे.









