आरसीयूच्या कुलगुरुंची उपस्थिती : 111 जणांना पदवीने सन्मानित
बेळगाव : केएलएस आयएमईआरचा तिसरा दीक्षांत सोहळा नुकताच आयएमईआरच्या सभागृहात पार पडला. यावेळी 111 एमबीए विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यापैकी पहिल्या 10 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला. व्यासपीठावर आरसीयूचे कुलगुरु डॉ. सी. एम. त्यागराजन, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉ. अजित परुळेकर, केएलएस संस्थेचे अध्यक्ष अनंत मंडगी उपस्थित होते. डॉ. त्यागराजन म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये सचोटीने काम करावे. कामाच्या ठिकाणी व्यावसायिक भावना जपण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाची त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे डॉ. अजित परुळेकर यांनी अल्मा मीटर टेक्नॉलॉजी व नवसंशोधन याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात अॅड. अनंत मंडगी म्हणाले, व्यावसायिक नीतिमत्तेने विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्याला सुरुवात करावी, असे सांगितले. कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन आर. एस. मुतालिक-देसाई यांनी स्वागत केले. संचालक डॉ. आरिफ शेख यांनी कॉलेजच्या प्रगतीचा आढावा घेतला. वृषाली भातकांडे यांना सुवर्णपदक, सुलय पुनाजीचे यांना रौप्यपदक तर रक्षा पांडे यांना कांस्यपदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.









