विश्वनाथन आनंद – नेपोम्नियाची, मॅग्नस कार्लसन – अॅरोनियन लढती अनिर्णीत
वृत्तसंस्था /दुबई
‘ग्लोबल चेस लीग’च्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ‘गंगा ग्रँडमास्टर्स’ने अव्वल स्थान कायम राखताना तिसरा विजय मिळवला. पांढऱ्या रंगाच्या सोंगट्या घेऊन खेळताना त्यांनी बालन अलास्कन नाइट्स संघाचा 11-6 असा पराभव केला. सुऊवातीपासूनच ‘गंगा ग्रँडमास्टर्स’ संघ आपली पकड सोडण्यास तयार नाही हे स्पष्ट झाले होते. पहिल्या क्रमांकाच्या पटावर विश्वनाथन आनंद आणि इयान नेपोम्नियाची यांच्यात वेगवान सामना बरोबरीत निघाला. तेथे नाइट्सचा आयकॉन खेळाडू असलेल्या नेपोम्नियाचीने एक मिनीटही न घालवता 30 चाली केल्या. सहाव्या पटावर ‘गंगा ग्रँडमास्टर्स’च्या आंद्रे एसिपेन्कोने रौनक साधवानीविऊद्ध सुऊवातीलाच मिळविलेली आघाडी सोडली नाही आणि लढत जिंकण्यात यश मिळविले. आणखी काही पटांवर पराभूत झाल्यामुळे लवकरच नाईट्स संघ अडचणीत सापडला. त्यांच्यासाठी आशेचा एकमेव किरण चार क्रमांकाच्या पटावरील दोन चिनी खेळाडूंमधील सामना राहिला. दोन माजी महिला विश्वविजेत्यांमधील या लढतीत ‘गंगा ग्रँडमास्टर्स’च्या हाऊ यिफनला खूप खराबरीत्या पराभूत व्हावे लागले अणि काळ्या सोंगट्या घेऊन खेळत असलेल्या तान झोंगयीने नाइट्सतर्फे जोरदार पुनरागमन केले.
दुसरीकडे, ‘गंगा ग्रॅँडमास्टर्स’च्या लेनियर डोमिंग्वेझ पेरेझने आपली परिस्थिती बळकट करून त्याचे विजयात रूपांतर केले, तर रिचर्ड रॅपोर्टने आपल्या हातातील अनुकूलता घालविल्याने शेवटी अब्दुसत्तोरोव्हविरुद्धची लढत त्याला अनिर्णीत अवस्थेत संपुष्टात आणावी लागली. तर प्रभावी खेळ करूनही बालन अलास्कन नाइट्सच्या बेला खोटेनाशविलीला तिच्याच जॉर्जिया देशाच्या निनो बत्सियाश्विलीकडून पराभव स्वीकारावा लागला. अन्य लढतीत त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्सला एसजी अल्पाइन वॉरियर्सकडून 7-8 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यांचा सर्वांत महत्त्वपूर्ण सामना लेव्हॉन अॅरोनियन (पांढऱ्या सोंगट्या) आणि सर्वोच्च मानांकित बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन या दोन आयकॉन खेळाडूंमध्ये झाला. दोन्ही बाजूंनी जोरदार झुंज दिली आणि अडचणीत आलेल्या कार्लसनने घड्याळात एका मिनीट शिल्लक असताना आपला बचाव करण्यात यश मिळविले. अॅरोनियनने प्रयत्न केला, पण जगातील सर्वोत्तम खेळाडू असलेल्या कार्लसनने आत्मविश्वासाने त्याच्या प्रतिस्पर्ध्याला बरोबरीत रोखले. इतर दोन गेम्सही बरोबरीत संपल्याने गुणसंख्या 3-3 अशी झाली होती. त्यानंतर ग्रँडमास्टर यू याने गुकेशला पांढऱ्या सेंगट्या घेऊन खेळताना पराभूत केले आणि किंग्ससाठी महत्त्वाचे तीन गेम पॉइंट मिळवले. पण भारताच्या प्रज्ञानंदने चार गेम पॉइंट्स मिळवताना जोनास बजेरेला हरवले आणि बाजी पलटविली. इरिना क्रश (एसजी अल्पाइन वॉरियर्स) आणि कॅटेरिना लागनो यांच्यातील लढतीवर सर्व काही अवलंबून होते. क्रशने वर्चस्व मिळवूनही ब्लिट्झमध्ये तीन वेळा विश्वविजेती राहिलेल्या लागनोने स्वत:ला हडबडू दिले नाही आणि सामना बरोबरीत सोडविला.









