मैदानाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ, मालिकेत आघाडी घेतल्याने ऑस्ट्रेलियाचे पारडे जड
वृत्तसंस्था/ लीड्स
लॉर्ड्सवर जॉनी बेअरस्टोच्या बाद होण्याने निर्माण झालेल्या वादाचे आज गुरूवारपासून हेडिंग्ले येथे सुरू होणाऱ्या तिसऱ्या ॲशेस
कसोटीवर सावट राहण्याची चिन्हे दिसत आहेत तसेच ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा उसळी घेण्यास उत्सुक इंग्लंडबरोबर संतप्त प्रेक्षकांचाही सामना करावा लागेल अशी अपेक्षा आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देखील बेअरस्टोच्या मुद्यावरून शाब्दिक बाऊन्सर्स टाकलेले आहेत. याची सुऊवात जेव्हा बेअरस्टोला ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरेने यष्टीचित केले तेव्हापासून झाली. त्यावेळी इंग्लंडच्या फलंदाजाला खेळात खंड पडला असल्याचे वाटले होते. बेअरस्टो अशा प्रकारे बाद झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने शानदार 155 धावांची खेळी करूनही ऑस्ट्रेलियाने 43 धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या ॲशेसमध्ये 2-0 ने आघाडी मिळविली होती. एरव्ही शांत असलेल्या लॉर्ड्सवर यामुळे नाराजीचा जोरदार सूर उमटून पाहुण्यांची हुर्यो उडविण्यात आली होती तसेच ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी गैरवर्तन केल्याप्रकरणी ‘एमसीसी’च्या तीन सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. सदर सदस्यांवर पॅव्हेलियनमध्ये पाहुण्या खेळाडूंशी अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप आहे.
त्यात भर म्हणून तिसरी कसोटी नेमकी बेअरस्टोच्या यॉर्कशायरच्या घरच्या मैदानावर होत आहे. हेडिंग्ले हे इंग्लिश क्रिकेटच्या सर्वात खडतर ठिकाणांपैकी एक असून एकंदर परिस्थिती पाहून येथील सुरक्षा उपायांमध्ये वाढ अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलियातील क्रिकेटशी संबंधित अनेक जण बेअरस्टोला कायदेशीर पद्धतीने बाद करण्यात येऊनही इंग्लंडमध्ये जी प्रतिक्रिया उमटली आहे त्यावरून आणि पाच वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत घडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ‘सँडपेपरगेट बॉल-टॅम्परिंग’ वादाशी या प्रकरणाला जोडण्याचा होणारा प्रयत्न पाहून थक्क झाले आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार माईक आथरटनने मात्र विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’चा गैरवापर केला असे म्हणण्यापेक्षा बेअरस्टो हा गलथानपणामुळे जास्त दोषी असल्याचे म्हटले आहे.
कर्णधार स्टोक्सने आपण अपील मागे घेतले असते असे म्हटले आहे आणि इंग्लंडचा माजी कर्णधार ज्यो रूटने देखील या सुरात सूर जुळविला आहे. एक संघ म्हणून आम्हाला क्रिकेट एका विशिष्ट पद्धतीने खेळायचे आहे आणि वैशिष्ट्यापूर्ण वारसा निर्माण करायचा आहे, असे त्याने म्हटले आहे. लॉर्ड्सवर सुरेख शतक झळकावलेल्या आणि इंग्लिश प्रेक्षकांच्या टोमण्यांचे लक्ष्य राहिलेल्या स्टीव्ह स्मिथने त्याचा आपल्याला त्रास होत नाही, असे म्हटले आहे. तर इंग्लंडमध्ये ॲशेस मालिका जिंकणारा 22 वर्षांतील पहिला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ठरण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पॅट कमिन्सने बेअरस्टोच्या बाद होण्यावरून निर्माण झालेला वाद यजमानांइतकाच पाहुण्यांनाही चवताळून टाकू शकतो, असे म्हटले आहे.
पण इंग्लंडसमोरील दोन कसोटी गमावल्यानंतर पुनरागमन करण्याचे आव्हान खडतर आहे. केवळ महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्याकडून प्रेरणा घेतलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने यापूर्वी 1936-37 ची ॲशेस मालिका 2-0 ने मागे पडल्यानंतर 3-2 ने जिंकली होती. तथापि, चार वर्षांपूर्वीच्या हेडिंग्ले येथील ॲशेस मालिकेतील सामन्यात स्टोक्सच्या अप्रतिम नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंडने एक गडी राखून विजय मिळविला होता. इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रेंडन मेकॉलमला या मालिकेत अजूनही संघ पुनरागमन करू शकतो असा विश्वास आहे.
लॉर्ड्सवर नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीस अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यात आलेले अपयश आणि अनेक बेपर्वा फटका हाणल्याने 1 बाद 188 वरून सर्व बाद 325 असा गडगडलेला पहिला डाव यांनी यजमानांची परिस्थिती खराब करून टाकली. इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनला सुऊवातीच्या दोन सामन्यांमध्ये फक्त तीन बळी मिळविता आले आहेत. त्यामुळे त्याचे स्थान धोक्यात येऊ शकते. फलंदाज ऑली पोपच्या खांद्याला दुखापत झाल्यानंतर इंग्लंडने आपल्या संघात फेरबदल केले असून हॅरी ब्रूकला आता पोपच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळू शकते. फिरकीपटू मोईन अली बोटाच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकल्यानंतर त्याला परत बोलावण्यात आले आहे. याशिवाय जलदगती गोलंदाज मार्क वुड आणि अष्टपैलू ख्रिस वोक्स यांचा अँडरसन आणि जोश टंग यांच्या जागी समावेश करण्यात आला आहे. लॉर्ड्सवर ऑफस्पिनर नॅथन लियॉनला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या जागी टॉड मर्फी हा एकमेव बदल ऑस्ट्रेलियन संघाला करावा लागलेला आहे.