असदुद्दीन ओवैसी यांनी दिले संकेत : ‘इंडिया’त सामील होण्याचे मिळाले नाही निमंत्रण
वृत्तसंस्था/ हैदराबाद
पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार असल्याने राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहेत. रालोआ आणि इंडियाच्या स्थापनेनंतर आता तिसरी आघाडी आकार घेऊ शकते. याचे संकेत ओवैसी यांनी दिले आहेत. तसेच तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व के. चंद्रशेखर राव करू शकतात असे ओवैसी यांनी म्हटले आहे.
एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीत सामील झालेले नाहीत. बसप प्रमुख मायावती, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि ईशान्येतील तसेच महाराष्ट्रातील काही पक्ष या आघाडीत सामील नाहीत. याचमुळे आम्ही के. चंद्रशेखर राव यांना तिसरी आघाडी निर्माण करण्यास आणि यात काही पक्षांना सामील करण्यास सांगितले आहे. एक राजकीय पोकळी निर्माण झाली असून या आघाडीत केसीआर यांच्या नेतृत्वामुळे ती भरून निघणार आहे. इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीत ही पोकळी भरून काढण्याची क्षमता नसल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे.
चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जगनमोहन रेड्डी यांना तुरुंगात डांबले होते. याचमुळे चंद्राबाबू यांनी स्वत:वरील आरोपांचा सामना करत प्रश्नांना उत्तरे द्यावीत असे ओवैसी यांनी नायडू यांच्या अटकेप्रकरणी बोलताना म्हटले आहे.
देशाला नव्या संसद भवनाची गरज होती, परंतु नवे संसद भवन निर्माण झाल्याने लोकशाही मजबूत होणार का संसदेचे कामकाज चालल्याने हा खरा प्रश्न आहे. संसद भवनाचे सौंदर्य त्याच्या वास्तूत नव्हे तर कामकाजात असल्याचे उद्गार ओवैसी यांनी काढले आहेत.
भाजपविरोधी इंडिया नावाच्या आघाडीत 26 पक्ष सामील असून यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना (युबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), माकप, भाकप, संजद, द्रमुक, आप, झामुमो, राजद, सप, एनसी, पीडीपी, रालोद, इंडियन युनियन मुस्लीम लीग, केरळ काँग्रेस (एम), मनीथानेया मक्कल काची, एमडीएमके, व्हीसीके, आरएसपी, केएमडीके, एआयएफबी, अपना दल कमेरावादी, पीजेंट्स अँड वर्कर पार्टी ऑफ इंडिया सामील आहे.









