सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे विचार
बेळगाव : संप्रदाय हा चांगला मार्ग असून यामध्ये कर्तव्याला महत्त्व आहे. आपल्याला कुठल्या मार्गाने जायचे आहे, याचे भान असले पाहिजे. अन्यथा, माणूस भरकटत जातो. जीवनात चिंतन आणि साधना यांचे संतुलन ठेवूनच काम केले पाहिजे. भगवद्गीतेमध्ये कर्माला महत्त्व आहे. मात्र, हे समजण्यासाठी ज्ञान गरजेचे आहे, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले. अकॅडमी ऑफ कम्पॅरिटिव्ह फिलॉसॉफी अॅण्ड रिलिजनच्यावतीने हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिराच्या शताब्दी महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटन करून ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष अशोक पोतदार, रामचंद्र मिशन हैदराबादचे कमलेश पटेल उपस्थित होते.
सचिव अॅङ एम. बी. जिरली यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रारंभी प्रार्थना सादर झाली. यावेळी संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई व जीव्हेश्वर महिला मंडळातर्फे भजन सादर करण्यात आले. यावेळी डॉ. मोहन भागवत व कमलेश पटेल यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन एसीपीआरच्यावतीने गौरव करण्यात आला. मंदिर परिसरात रोप लागवडीलाही चालना देण्यात आली. डॉ. भागवत पुढे म्हणाले, भक्तीशिवाय ज्ञान अहंकाराकडे घेऊन जाते. ज्ञान आणि कर्माबरोबर भक्ती असली पाहिजे. ज्ञान, भक्ती आणि कर्म ही तिन्ही सोबतच चालतात. यावेळी कमलेश पटेल म्हणाले, रामायण, महाभारत कशासाठी झाले, याची जाणीव ठेवून राष्ट्राची सेवा केली पाहिजे, असे स्पष्ट केले. यावेळी एसीपीआर पदाधिकारी, भजनी मंडळ आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.









