वृत्तसंस्था/ सिडनी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ (आयसीसी) कसोटी क्रिकेटसाठी किमान 15 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारण्याचा विचार करत आहे. यामुळे खेळाडूंची मॅच फी वाढेल आणि फायदेशीर टी-20 फ्रँचायझी लीगकडे खेळाडूंनी स्थलांतर करण्याचा ओघ रोखण्यास मदत होईल.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) प्रस्तावित केलेल्या या उपक्रमाला आयसीसीचे पुढील अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेले बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांचा पाठिंबा आहे, असे दि सिडनी मॉर्निंग हेराल्डने म्हटले आहे. हा निधी कसोटी खेळाडूंसाठीच्या किमान मॅच फीमध्ये वाढ करेल आणि परदेश दौऱ्यावर संघ पाठवण्याचा खर्चही भागवेल. हे वेस्ट इंडिजसारख्या राष्ट्रीय मंडळांना फायदेशीर ठरेल, जे सध्या जागतिक टी-20 स्पर्धांमध्ये दिल्या जाणाऱ्या वेतनाशी स्पर्धा करण्याच्या बाबतीत संघर्ष करत आहेत.
सदर निधी सर्व खेळाडूंसाठी किमान कसोटी मॅच फी सुनिश्चित करेल, जी 10,000 डॉलर्स असेल असे मानले जात आहे आणि संघर्ष करणाऱ्या देशांना परदेश दौऱ्यांचा खर्च चुकता करेल, असे या वृत्तात म्हटले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन श्रीमंत क्रिकेट राष्ट्रांना मात्र या निधीचा फायदा होण्याची शक्यता नाही. कारण ते आधीच त्यांच्या खेळाडूंना भरीव वेतन देतात. तथापि, ‘आयसीसी’कडून कसोटी क्रिकेटसाठी किती पैसे उपलब्ध होऊ शकतो हे ब्रॉडकास्टर स्टारसोबतच्या त्यांच्या वादावर अवलंबून राहण्याची शक्यता आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.









