कायदामंत्री एच. के. पाटील यांची विधानसभेत माहिती
बेळगाव : बेळगावमधील सांबरा विमानतळाला वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांचे तर हुबळी विमानतळाला क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचे नाव देण्याबाबत मागणीचा विचार केला जाईल, असे उत्तर कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी बुधवारी विधानसभेत दिले. हुबळी आणि बेळगावमधील विमानतळाला ऐतिहासिक महापुरुषांची नावे देण्याच्या बाबतीत राज्य सरकार सकारात्मक आहे. विमानतळांचे फेरनामकरण करण्याचा निर्णय सभागृहात संमत करावा याकरिता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, असे त्यांनी सांगितले. बुधवारी शून्य प्रहर वेळेत आमदार एन. एच. कोनरेड्डी यांनी हुबळी आणि बेळगाव विमानतळांच्या नामकरणा मुद्दा उपस्थित केला. हुबळी विमानतळाला संगोळ्ळी रायण्णा यांचे तर बेळगाव विमानतळाला कित्तूर चन्नम्मा यांचे नाव द्यावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. याविषयी सरकारला अनेक संघटनांकडून निवेदने देण्यात आली आहेत. त्यामुळे सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. भाजपचे आमदार अरविंद बेल्लद यांनी कोनरेड्डी यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.
यावेळी मंत्री एच. के. पाटील म्हणाले, कोणत्या शहरात विमानतळ निर्माण झाले आहे, त्या शहराचे नाव देण्याची पद्धत आहे. अशी नावे बदलण्याचा अधिकार केंद्र सरकारच्या नागरी विमानो•ाण मंत्रालयाच्या कक्षेत येतो. राज्य सरकारला राज्यातील कोणत्याही विमानतळाचे फेरनामकरण करण्याचा विचार केल्यास आधी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रस्ताव मांडून मंजुरी मिळवावी लागते. त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागतो, असे स्पष्टीकरण दिले. बेळगाव विमानतळाला कित्तूर राणी चन्नम्मा यांचे आणि हुबळी विमानतळाला क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचे नाव देण्याच्या मागणीबाबत विचार केला जातोय. याविषयी सभागृहात प्रस्ताव आणून पुढील कार्यवाही करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, असे आश्वासन मंत्री एच. के. पाटील यांनी दिले.









