अध्याय दुसरा
भीष्म आणि द्रोण ह्यांचे आपल्यावर अत्यंत उपकार आहेत आणि त्यामुळे आपण त्यांच्याशी युद्ध करू शकत नाही असे अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले. पण त्याला युद्ध न करण्याविषयी आपण सांगत असलेली कारणे पटत नाहीत. म्हणजे आपण नक्की कुठतरी चुकतोय हे समजून अर्जुन म्हणाला, नक्की जय कुणाचा व्हावा, आमचे कल्याण कशात आहे हेच मला कळेनासे झाले आहे. एक मात्र नक्की ज्यांना मारून जगावे असे मला वाटत नाही तेच नेमके येथे युद्धाला समोर उभे आहेत. ह्या अर्थाचा ह्यांचा चि व्हावा जय आमुचा की । कशात कल्याण असे न जाणे? मारूनि ज्याते जगणे न इच्छू । झुंजावया ते चि उभे समोर ।। 6 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार अर्जुन गोंधळात पडलेला असून कशात कुणाचे कल्याण आहे हेच त्याला कळेनासे झाले आहे. म्हणून पुढील श्लोकात श्रीकृष्णांना शरण जाऊन तो म्हणाला, माझी विचारसरणी कमकुवत झाली आहे. माझे चित्त मोहित झालेले असल्याने माझे मन धर्म-अधर्म काही जाणेनासे झाले आहे. म्हणून ज्याने माझे भले होईल ते मला सांगा. मी तुमचा शिष्य आहे. तुम्हाला शरण आलेलो आहे. मला आपण उपदेश करा.
दैन्याने ती मारिली वृत्ति माझी । धर्माचे तो नाशिले ज्ञान मोहे? कैसे माझे श्रेय होईल सांगा। पायांपाशी पातलो शिष्य-भावे ।। 7 ।।
येथे प्रेयस आणि श्रेयस ह्या दोन शब्दाबद्दल थोडासा विचार करू. प्रेयस म्हणजे आपल्याला आनंद देणारी गोष्ट, अर्थात माणसाला जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आनंद होतो तो तात्पुरता असतो कारण त्या गोष्टीतील नाविन्य संपले की, झालेला आनंदही ओसरतो. श्रेयस म्हणजे जेव्हा दोन गोष्टी समोर ठाकल्या असतील त्यातील आपले हित करणारी गोष्ट. ही बाब लक्षात घेऊन अर्जुनाने युद्ध करणे आणि न करणे ह्यातील त्याच्या हिताची गोष्ट कोणती आहे ते मला सांगा अशी श्रीकृष्णाना विनंती केली.
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुन श्रीकृष्णांना असे म्हणाला की, आम्हाला काय करणे उचित आहे, हे कितीही विचार केला तरी सुचत नाही कारण मोहामुळे माझे चित्त व्याकूळ झाले आहे. डोळ्यांवर कचरा आला म्हणजे दृष्टीचे तेज लोपते, मग जवळ असलेली कोणतीही वस्तु दिसेनाशी होते, माझे तसेच झाले आहे. माझ्या मनाचा गोंधळ उडाल्याने मला योग्य काय, अयोग्य काय हे काहीच कळेनासे झाले आहे. मी आता तुम्हाला शरण आलेलो आहे. तरी श्रीकृष्णा, यासंबंधी विचार करून जे माझ्या हिताचे असेल ते मला सांगा.
कारण आमच्यासाठी सखा, गुरु, बंधु, पिता, इष्ट देवता आणि संकटसमयी आमचे रक्षण करणारे तुम्हीच आहात. शिष्याचा अव्हेर करण्याची गोष्ट गुरूच्या मनातही येत नाही. समुद्र नद्यांचा त्याग कसा करेल? मुलाला आई जर सोडून गेली तर ते कसे जगेल? म्हणून म्हणतो देवा, सर्वतोपरी तुमचाच एक आम्हाला आधार आहे. युद्ध न करण्याविषयी माझे बोलणे तुम्हाला पटत नसेल तर जे धर्माला उचित आहे ते पुरुषोत्तमा चटकन सांगा. हे सर्व नातेवाईक पाहून माझ्या मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुमच्या उपदेशावाचून दुसऱ्या कशानेही शमणार नाही.
अर्जुन हा भगवंतांचा पट्टशिष्य होता. त्यामुळे अनाकलनीय परिस्थिती निर्माण झाल्यावर तो मनोभावे भगवंतांना शरण गेला. येथे माउलीना असे सुचवायचे आहे की, आपल्याला अडचण आल्यावर आणि ती सोडवण्यासाठी काय करावे आणि काय करू नये हे कळेनासे झाले की, सद्गुरुंना शरण जावे म्हणजे ते आपल्या प्रेमापोटी योग्य तो सल्ला देतील. तो सल्ला नितीशास्त्राला धरून असेल. कदाचित सुरवातीला त्यात आपले भले दिसणार नाही पण अंतिमत: तेच श्रेयस्कर असल्याचा अनुभव येईल.
क्रमश:








