ग्रामीण भागातील महिलांत घबराट
कसबा बीड/ प्रतिनिधी
आज बुधवारी (दि. ५) पहाटे सव्वा पाचच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी रस्त्याने मॉर्निंग वॉकला चाललेल्या इंदुबाई दिनकर मोहिते (सावर्डे दुमाला) या महिलेला वाटेत अडवून तिच्या गळ्यातील ५ तोळ्याचे दागिने (चिताक) लंपास केले. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चोरीच्या या प्रकाराने ग्रामीण भागातील महिलांत घबराट पसरली आहे.
नेहमीच्या सवयीप्रमाणे इंदुबाई मोहिते या पहाटे व्यायाम म्हणून फिरायला जातात. गावातील अनेक महिला, पुरुषही या दरम्यान फिरायला जातात. आज इंदुबाई या चालायला एकट्याच होत्या. लांब अंतरावर अन्य महिला पुढे चालत होत्या. एक – दीड किलोमीटरचे अंतर चालून इंदुबाई घरी परत येत होत्या. सावर्डे – सडोली दुमाला दरम्यानच्या ओढ्यालगतच्या रस्त्याजवळ आल्यावर समोरून एक मोटारसायकल येऊन थांबली. आणि अचानक आणखी दुसऱ्या एका मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी खाली उतरून इंदुबाई यांच्या तोंडाला रुमाल दाबून दमदाटी केली. त्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न करताच तिसऱ्या चोरट्याने येऊन त्यांना पकडून धरले आणि गळ्यातील चिताक हिसकावून घेऊन पोबारा केला.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या इंदुबाई यांनी आरडाओरडा केला. पण जवळपास कोणी नसल्याने त्यांचा आवाज कुणाला ऐकू गेलाच नाही. काही वेळात येणारे – जाणारे आले पण तोपर्यंत चोर पळून गेले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून मोहिते कुटुंबीयांकडून करवीर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली.
घटनास्थळी दुपारच्या सुमारास करवीरचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक अरविंद काळे, उपनिरीक्षक सूरज बनसोडे आदींनी पाहणी करून माहिती घेतली. यावेळी पोलीस पाटील पंकज गुरव उपस्थित होते. या चोरीच्या घटनेने ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेने या चोरीचा छडा तात्काळ लावावा आणि चोरांना अद्दल घडवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.