रत्नागिरी :
शहरानजीक खेडशी गयाळवाडी येथे मोबाईल शॉपी फोडणाऱ्या दोघा चोरट्यांच्या पोलिसांनी २४ तासात मुसक्या आवळल्या. मंगळवारी रात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोघा चोरट्यांना मडगाव रेल्वे स्टेशन गोवा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शादाब मोहम्मद रेहमुद्दीन मुस्तकीम (२७) व झुबेर लियाकत अली (२२, रा. दोन्ही जिल्हा बागपथ, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गयाळवाडी येथे मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात १४ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास चोरी झाली होती. १५ रोजी सकाळी दुकान मालक सुदेश तुकाराम गुरव (३०, रा. टेंभ्ये, रत्नागिरी) हे शॉपी उघडण्यासाठी आले असता चोरट्यांनी ती फोडल्याचे दिसले. चोरट्यांनी शॉ पीचा पत्रा उचकटून आतमध्ये प्रवेश केला. तसेच आतील लॅपटॉप व दुरुस्तीला आलेले मोबाईलसह इतर वस्तू असा मिळून ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.








