गायकमंडळीच्या वाद्यांची चोरी : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली मदत : पोलीस खात्याच्या दुर्लक्षाबद्दल संताप
प्रतिनिधी / बेळगाव
दोनवेळच्या जेवणाची भ्रांत ज्यांना पडते ती मंडळी अर्थार्जनाचे वेगवेगळे मार्ग शोधतात. विविध वाद्यांचे वादन करून लोकांचे मनोरंजन करत चार पैसे मिळविणारी गायकमंडळी बेळगाव शहरात फिरत आहे. परंतु त्यांच्या वाद्यांची चोरी करून त्यांचे पैसेही चोरटय़ांनी लांबविले असून पोलीस खात्याच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
चोऱया थांबत नाहीत आणि नागरिकांचे भय संपत नाही, हे बेळगावचे वास्तव आहे. घरफोडी, दरोडे हे तर सोडाच, आता बेळगावमध्ये भुरटय़ा चोरटय़ांचे प्रमाणही वाढले आहे. ही कहाणी आहे चंदगडच्या बसर्गे गावच्या कलाकारांची. येथील भरमू, कल्लाप्पा, नारायण, कल्पना हे सर्व कलाकार ढोलकीवादन करून बेळगाव शहरात लोकांचे मनोरंजन करतात आणि मिळालेल्या पैशांवर आपला उदरनिर्वाह करतात.
बुधवारी हे कलाकार लोकांचे मनोरंजन करून घटकाभर विश्रांतीसाठी समादेवी गल्ली येथील मारुती मंदिरात गेले आणि आपल्या वाद्याची साधने ठेवून ते चहा घेण्यास गेले असता त्यांची वाद्येच चोरांनी पळविली. शिवाय पैसेही लांबविले. त्यांच्याकडची ढोलकी ही शिसमची असून तिची किंमत अंदाजे 8 हजार रुपये
आहे.
येथीलच कार्यकर्ते बबन भोबे यांनी या कलाकारांना पोलीस स्थानकात जाऊन तक्रार नोंदविण्यास सांगितले व तात्पुरती मदत केली. या कुटुंबातील वयोवृद्ध मंडळी आजारी असून त्यांच्या औषधपाण्याचाही खर्च आहे. मात्र वाद्य आणि पैसे लांबविल्याने आता पुढे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील यांनी या कलाकारांची भेट घेऊन त्यांना पुन्हा ढोलकी आणि वाद्य साहित्य भेटी दाखल दिले. याप्रसंगी बबन यांच्या समवेत मनोहर बुक्मयाळकर, भीमसी कोळी, सरस्वती जाधव आदी उपस्थित होते.









