सांगरूळ /वार्ताहर
सांगरूळ (ता. करवीर) येथील हौसाबाई शंकर नाळे या वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळ्याचे चिताक अज्ञातानी दिवसाढवळ्या हिसकावून घेऊन पलायन केले आहे. या घटनेची करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
हौसाबाई नाळे यांचे सांगरूळ मल्हारपेठ कळे या रस्त्यावर राहते घर आहे. दुपारी चारच्या सुमारास त्या घराच्या दारातील तण काढत होत्या. यावेळी मोटरसायकलवरून दोन तरुण आले आणि हौसाबाई आणि त्यांच्या सुनबाई वैशाली यांच्याकडे पिण्यासाठी पाणी द्या अशी मागणी केली. सुन वैशाली पाणी आणण्यासाठी घरात गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी हौसाबाई यांच्या गळ्यातील साडेपाच तोळ्याचे चिताक हिसकावून घेतले. त्यातील एका चोरट्याने घराशेजारील ऊसाच्या शेतात पलायन केले. दुसऱ्याने गाडीवरून पलायन केले.
दरम्यान, हौसाबाई आणि वैशाली यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या तरुणांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला .पण त्यांचा पत्ता लागला नाही . यावेळी उपस्थित तरुणांनी याची माहिती तात्काळ कळे पोलिसांना दिली. कळे पोलिसांनी नाकाबंदी केली तर एलसीबी पथकाने शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण चोरटे आढळून आले नाहीत. गावातील काही सीसीटीव्ही व कळे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचे काम सुरू असून अधिकचा तपास पोलीस करत आहेत .









