खानापूर तालुक्यातील देवलत्ती येथील घटना
खानापूर : तालुक्यातील देवलत्ती येथील सराफाचे लक्ष विचलित करून चोरट्यांनी पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याबाबत खानापूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत खानापूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, देवलत्ती येथील इराण्णा प्रल्हाद सूर्यवंशी यांचे श्रीलक्ष्मी देवी ज्वेलर्सचे दुकान आहे. बुधवार दुपारी दीडच्या सुमारास दुचाकीवरून दोघेजण सोने खरेदीच्या बहाण्याने सूर्यवंशी यांच्या दुकानात आले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची चौकशी सुरू केली. वेगवेगळे दागिने पाहिले. काही दागिने पसंत केले. मात्र यावेळी सूर्यवंशी यांचे लक्ष विचलित करून पाच तोळ्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पलायन केले. चोरट्यांनी आपल्या दुकानात चोरी केल्याचे काही वेळानंतर लक्षात येताच त्यांनी खानापूर पोलिसांना माहिती दिली. खानापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा तपास करण्यासाठी धारवाडपर्यंत पोलीस पथक रवाना झाले. मात्र पोलिसांच्या हाती काही लागलेले नाही. खानापूर पोलिसांत गुन्हाची नोंद झाली असून खानापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
अपरिचित ग्राहकांपासून सराफांनी दक्ष रहावे
अशाच प्रकारे खानापूर शहरात गेल्या दीड महिन्यापूर्वी रेणुका ज्वेलर्स या दुकानातही दुकान मालकाचे लक्ष विचलित करून जवळपास चार तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडलेली होती. अशा अपरिचित ग्राहकांपासून सराफांनी दक्ष रहावे असे आवाहन खानापूर पोलिसांनी केले आहे.









