वार्ताहर/उचगाव
उचगावनजीक बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील मार्कंडेय नदीकाठावरील गणेश मंदिरातील दानपेटी चोरांनी सोमवारी रात्री लांबविल्याची घटना घडली आहे. उचगाव परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांना ऊत आला आहे. गेल्या आठवड्याभरात दुकानांमध्ये चोरीची घटना ताजी असताना पुन्हा मंदिरातील दानपेटी लांबविल्याने उचगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश मार्कंडेय मंदिरामध्ये सोमवारी रात्री चोरट्यांनी मंदिराचा समोरच्या दरवाज्याचे दोन कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला आणि आत असलेल्या दानपेटीचा कुलूप तोडून रक्कम लंपास केली आहे. सदर पेटी दोन महिन्यांनी एकदा उघडण्यात येते. मात्र सकाळी पूजेसाठी मंदिराचा पुजारी गेला असता सदर प्रकार त्यांच्या नजरेला आला त्यावेळेला दोन्ही कुलूप तोडलेले होते आणि दरवाजे उघडे होते. यावेळी संबंधित मंदिराच्या कमिटीला कळविण्यात आले. त्यानंतर पाहणी केली असता मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम पळविलेली होती. यापूर्वीही याच मंदिरात पाच सहा वेळा अशाच प्रकारच्या चोऱ्या झालेल्या आहेत. उचगाव गावामध्ये पोलिसांची व्हॅन कायमस्वरूपी असते मात्र चोरीचे सत्र काही थांबत नाही.









