पिरनवाडीतही घर फोडले : अडीच लाखाचा ऐवज लांबविला
प्रतिनिधी /बेळगाव
दत्त कॉलनी, नेहरुनगर, मच्छे येथील चोरीची घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी पिरनवाडी येथे आणखी एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 6 तोळ्यांचे दागिने, 10 तोळे चांदीचे दागिने असा सुमारे अडीच लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लांबविला आहे. सोमवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे.
बाबू सदाशिव होळकर या खासगी कंपनीत काम करणाऱ्या कामगाराच्या घरी चोरीची घटना घडली आहे. रविवार दि. 1 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता आपल्या घराला कुलूप लावून बाबू आपल्या कुटुंबीयांसमवेत अय्यप्पा स्वामींच्या महापूजेत भाग घेण्यासाठी शिंदोळीला गेले होते. सोमवार दि. 2 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता बाबू घरी पोहोचले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
दर्शनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आहे. तिजोरी फोडून 30 ग्रॅमचे गंठण, 5 ग्रॅमची चेन, 12 ग्रॅमची चेन, 10 ग्रॅमच्या दोन अंगठ्या, 6 ग्रॅमची कर्णफुले असे एकूण 63 ग्रॅम सोने, 10 तोळे चांदी, टीव्ही व इतर वस्तू चोरट्यांनी पळविल्याचे उघडकीस आले आहे.
बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत.









