दोन घरे फोडली तर सात घरे फोडण्याचा प्रयत्न : सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड पळविली
बेळगाव : होनगा येथे चोरट्यांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे. शांतीनगर परिसरातील दोन बंद घरांचा कडीकोयंडा तोडून सुमारे 7 लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविली आहे. अन्य सात घरे फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी या परिसरातील एक मोटारसायकलही पळविली आहे. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस उपनिरीक्षक किरणकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. एकाच परिसरात झालेल्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
उपलब्ध माहितीनुसार शांतीनगर येथील लक्ष्मण खाचू पाटील यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरातील सात तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. होनगा येथील काळभैरव यात्रेला गेले असता ही घटना घडली आहे. रविवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. याच परिसरातील नौशाद कलमकोडी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरातील तीन लाख रुपये रोकड पळविण्यात आली आहे. नौशाद हे ढाबाचालक आहेत. नेहमीप्रमाणे शनिवारी ते आपल्या ढाब्यावर गेले होते. घरी इतर कोणी नव्हते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरातील रोकड पळविली आहे. लक्ष्मण व नौशाद यांच्या घराच्या आजूबाजूला असलेली अन्य सात घरे फोडण्याचा प्रयत्न झाला आहे.









