चार घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास : अधिवेशन काळात चोरट्यांनी साधला डाव
बेळगाव : आनंदनगर-वडगाव येथील दुसऱ्या क्रॉसजवळ मंगळवारी मध्यरात्री चार घरे फोडून चोरट्यांनी एकच उच्छाद मांडला. यामध्ये तीन घरे फोडून त्या घरांतील सोन्या, चांदीच्या दागिने चोरुन नेले. तर एक ठिकाणी त्या चोरट्यांचा डाव फसला आहे. तर साई कॉलनीतील एका घरामध्ये धाडशी चोरी करुन लाखो रुपयांचा ऐवज व रोख रक्कम लांबविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. चोरट्यांनी अधिवेशन काळातच डाव साधला असून या घटनेमुळे वडगावसह संपूर्ण शहर हादरले आहे. आनंदनगर-दुसरा क्रॉस येथे राहणारे डॉ. प्रदीप शहाजीराव शिंदे यांच्या घरामधील बेडरुच्या कपाटमधील 175 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी हातोहात लांबविले आहेत. या चोरी दरम्यान त्यांचे आई-वडील खाली असलेल्या खोलीमध्ये झोपले होते. चोरट्यांनी वरच्या मजल्यावरील बेडरुममधील सोन्याचे दागिने हातोहात लांबविले. त्यानंतर दुसराक्रॉस आनंदनगर येथे भाड्याने राहणाऱ्या रतनकुमार जांडील यांच्या बंद घरामध्ये शिरुन कपाटातील सोन्याचे दागिने लांबविले आहेत. त्या ठिकाणी असलेले चांदीच्या दागिन्यांना मात्र चोरट्यांनी हात लावला नाही. त्यानंतर आनंदनगर, दुसरा क्रॉसमधील अनिल बसवाणी गोकाक याच्या घराचा चोरट्यांनी कडीकोयंडा फोडून आत प्रवेश केला. त्या ठिकाणी असलेल्या कपाटातील 33 ग्रॅम सोन्याची चेन व इतर दागिने चोरुन नेले आहेत. या घटनेनंतर दुसरा क्रॉस येथे राहणाऱ्या संतोष पवार याच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले. 125 ग्रॅम सोन्याचे दागिने, 40 हजार रुपये लांबविले.
चोरट्यांनी साई कॉलनीकडे आपला मोर्चा वळविला. तेथे असलेल्या ज्ञानेश्वर राजेश पावशे यांच्या घराला लक्ष्य केले. घरात सर्व जण झोपले असताना चोरट्यांनी त्यांच्या बेडरुममध्ये प्रवेश केला. बेडरुममधील 125 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख 40 हजार रुपये लांबविले. यावेळी ज्ञानेश्वर यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी कोणी तरी घरात आले आहे, असे पतीला सांगितले. तुला भास झाला असेल झोप असे म्हणले. मात्र खाली झोपलेल्या आई राजश्री यांना जाग आली. त्यांनी आरडाओरड केली. यावेळी चोरटा वरच्या बेडरुममधून खाली उतरत होता. मात्र त्याच्या हातामध्ये शस्त्र होते. तरी देखील राजश्री यांनी आरडाओरड करत पाठलाग केला. मात्र चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला. या घटनेनंतर या परिसरातील जनता जागे झाली. सर्व जण जमा झाले. तातडीने या घटनेची माहिती शहापूर व टिळकवाडी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पहाटेच श्वान पथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान पथक काही अंतरावच घुटमळले. या धाडशी चोरीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री 3 ते पहाटे 4.30 पर्यंत या चोऱ्या झाल्या आहेत. या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली होती.
शहापूर दोन तर टिळकवाडी स्थानकात एका घटनेची नोंद
या चोरीच्या घटनेनंतर प्रदीप शिंदे यांनी शहापूर पोलीस स्थानकामध्ये चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. 175 ग्रॅम सोने चोरट्यांनी चोरुन नेले असून अंदाजे 8 लाख 56 हजार 778 रुपयांचा किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याचबरोबर तेथेच राहणाऱ्या अनिल बसवाणी गोकाक यांचे 33 ग्रॅम सोने लांबविल्याची फिर्याद दाखल झाली आहे. त्यांचा एकूण 1 लाख 49 हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. रतनकुमार जांडील यांच्या घरामध्ये चोरी झाली आहे. मात्र ते बाहेर गावी गेल्यामुळे त्यांची फिर्याद रात्री उशीरापर्यंत दाखल करण्यात आली नव्हती. टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये ज्ञानेश्वर राजेश पावशे यांनी चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. 125 ग्रॅम सोने आणि रोख 40 हजार रुपये चोरट्यांनी चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एकूण 5 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद झाली आहे.
मॉर्निंग वॉकर्स महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविले
येळ्ळूर रोडकडे मॉर्निंग वॉकर्ससाठी गेलेल्या एका महिलेला भामट्याने शस्त्र दाखवून त्यांच्या गळ्यातील दागिने लांबविल्याचेही येथील नागरिकांनी सांगितले आहे. घाबरुन त्या महिलेने ते दागिने दिले. त्यानंतर तीने इतरांना सांगितले. मात्र तोपर्यंत त्या भामट्यांनी तेथून पलायन केले. यामुळे एखादी मोठी टोळीच सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेची मात्र रात्री उशीरापर्यंत नोंद झाली नव्हती.
पोलिसांनी गस्त घालणे महत्त्वाचे
सध्या अधिवेशन असल्यामुळे पोलिसांना सुवर्णसौधसह शहरामध्ये तैनात करण्यात आले आहे. हीच संधी साधत चोरट्यांनी ही धाडशी चोरी केली आहे. एकाच रात्री चार घरांमध्ये चोरी करुन लाखो रुपयांचा ऐवज लांबविला आहे. त्यामुळे रात्री पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी होत आहे. येळ्ळूर रस्त्यावर खानापूरकडून येणाऱ्या ट्रक अडविण्याचे काम केले जात आहे. मात्र चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील होत आहे.
राजश्री पावशे यांनी दाखविला धाडसपणा
घरामध्ये चोरटे शिरल्याची चाहुल लागताच राजश्री पावशे यांच्या सुनेने चोर, चोर असा आरडाओरडा केला. त्यामुळे सासू राजश्री या जाग्या झाल्या. त्यांनी चोरट्याचा पाठलाग केला. आपल्या मुलाला तरी काही झाले नाही ना, ही भीती त्यांना वाटत होती. तरी देखील चोरटा पळत असताना त्याच्या पाठोपाठ पळाल्या. मात्र चोरट्याने जवळच असलेल्या शिवारातून पलायन केले.









