पोलिस कॉन्स्टेबलसह कुख्यात सिद्दिकी उर्फ सुलेमान खानचे पलायन : कॉन्स्टेबलने सुलेमानचे कोठडीतून स्वत: केले ‘चेकआऊट’
पणजी : कुख्यात गुन्हेगार सिद्दीकी उर्फ सुलेमान खान (55 वर्षे, रा. म्हापसा) हा रायबंदरच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस कोठडीतून काल शुक्रवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास पसार झाला आहे. विशेष म्हणजे त्याच्या सुरक्षेत तैनात असलेला आयआरबी पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक (दाबोळी) याने सुलेमानला कोठडीतून बाहेर काढले आणि दोघेही दुचाकीवरुन पसार झाले आहेत. ही घटना लक्षात आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांना पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या. या घटनेवरून पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अगोदरच बदनाम असलेल्या पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. पोलिसांच्या या गचाळपणावर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे, दरम्यान रात्री कॉन्स्टेबल अमित नाईक कर्नाटकातील हुबळी पोलिसस्थानकात शरण आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 2.30 ते 3.00 वाज्ण्याच्या सुमारास ही घटना घडली. संशयित कॉन्स्टेबलने सुलेमान खानला आधी कोठडीतून बाहेर काढले. नंतर सुलेमानला आपल्या दुचाकीवर बसवले आणि दोघांनीही पलायन केले. पोलिसांनी लगेचच यासंबंधीच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहे. त्या संशयित कॉन्स्टेबलविऊद्ध शिस्तभंगाच्या कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्यात आला आहे.
आरोपी सुलेमानला प्राधान्यक्रमाची वागणूक दिल्याचा आरोप निराधार आणि खोटा आहे. तरीही गुन्हे शाखेतील कोठडीत आणि संशयित पोलिसाच्या कारभाराची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे, अशी माहिती अधीक्षक राहूल गुप्ता यांनी दिली. पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईकला निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात जुने गोवे पोलिसस्थानकात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला. पलायन केलेल्या दोघानांही शेजारील प्रदेशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी राज्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत, दोघांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी गोवा पोलिस शेजारील राज्यांतील पोलिसांशी समन्वय साधत आहेत, असे गुप्ता यांनी सांगितले.
………………………………………..बॉक्स………………………………………………………..
सिद्दिकी उर्फ सुलेमान खानचे कारनामे
सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याच्यावर जमीन हडप प्रकरणे, खून, खुनी हल्ला व फसवणूक यासारखे देशभरात एकूण 15 गुन्हे नोंद आहेत. यात गोव्यात 7, दिल्लीत 1, हैदराबादमध्ये 4 व पुणे येथे नोंद झालेल्या 3 गुह्यांचा समावेश आहे. जमीन हडप करण्याही तो माहीर असून त्याने एकतानगर म्हापसा येथे 1, गवळीमौळा, तिसवाडी येथे 3 व थिवी येथे 2 अशा एकूण 6 मालमत्ता त्याने हडप केलेल्या आहेत. चौकशी दरम्यान त्याने आणखी चार मालमत्तांची नावे उघड केली होती. म्हापसा, बेळगाव सारख्या ठिकाणी संशयिताने जमीन खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक केलेली आहे. सिद्दीकी खानच्या नावे सात बँक खाती होती. त्यात किरकोळ रक्कम होती. संशयित वापरत असलेल्या एका महिलेच्या बँक खात्यात 1.36 कोटी ऊपये होते. हे खाते गोठवण्यात आले आहे. तो मध्यवयीन महिलांशी मैत्री करत होता. त्या महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्या बँक खात्यामार्फत आर्थिक व्यवहार करत होता. गोव्यासह दिल्ली, हैदराबाद, हुबळी, धारवाड, पुणे सारख्या भागातील 35 महिलांची त्याने गुन्हेगारी कारवायांत मदत घेतलेली आहे. त्याच्याकडे बोगस वाहनचालक परवाना आणि पॅनकार्ड सापडले असून ही कागदपत्रे त्याने कुठून मिळवली आहेत, याचाही तपास सुरू आहे.
खाकी वर्दीला फासला काळीमा
पोलिसानेच आरोपीला कोठडीचे दार उघडून देणे आणि पलायन करण्यास मदत करणे तसेच त्याच्यासोबत स्वत: जाणे ही आतापर्यंतच्या गोव्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. यापूर्वी पोलिसांच्या तावडीतून अनेक आरोपी पळाले आहेत. आरोपींना न्यायालयात नेत असताना किंवा वैद्यकीय तपासणीसाठी नेत असता किंवा तुऊंगातून कैदी पळाले आहेत. अशा प्रकारे आरोपीला आपल्या दुचाकीवरून घेऊन जाऊन पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याने खाकी वर्दीला काळीमा फासला आहे.
साडेचार वर्षे होता फरार
जमीन बळकावणारा सिद्दीकी उर्फ सुलेमान खान 3 प्रकरणांमध्ये एसआयटीला हवा होता आणि उत्तर गोव्यातील दोन प्रकरणांमध्ये घोषित गुन्हेगार होता, त्याला गुन्हे शाखेच्या एसआयटीने (विशेष तपास पथक) 12 नोव्हेंबर 2024 रोजी अथक प्रयत्नांनंतर अटक केली होती. त्यापूर्वी तो साडेचार वर्षांपासून फरार होता.
‘चौकीदार चोर है’ : पणजीकर
आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक आणि त्याच्या साथीदारांनी जमीन घोटाळा प्रकरणातील सिद्दीकी उर्फ सुलेमान खानला गुन्हे शाखेच्या कोठडीतून पळून जाण्यास मदत केली आणि गोव्याच्या भाजप सरकारने जगाला दाखवून दिले की ‘चौकीदार चोर है’. सदर घटना म्हणजे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवंदना आहे, असे काँग्रेस मीडिया सेल प्रमुख अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : सरदेसाई
हॉटेलमधून चेक आऊट केल्याप्रमाणे आरोपीला कोठडीतून बाहेर काढून उत्कृष्ट ग्राहक सेवा बजावली, असा टोला गोवा फॉरर्वडचे विजय सरदेसाई यांनी मारला आहे. जमीन हडप प्रकरणातील प्रमुख आरोपी ज्या पद्धतीने क्राईम ब्रँचच्या कोठडीतून बाहेर पडला ते पाहिल्यास हे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे, असे दिसून येते. पोलीस खात्यातील उच्च पातळीवरील राजकीय हस्तक्षेपाची सर्वांना जाणीव आहे आणि असे आदरातिथ्य अगदी वरच्या बाजूने हिरवा सिग्नल मिळाल्याशिवाय शक्यच नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या ताब्यात असलेल्या गुन्हेगारांना अतिथी देवो भव तत्त्वाचा विस्तार करणे थांबवावे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास गोव्याचे भले होईल, असेही विजय सरदेसाई म्हणाले.
सरकारचीच चौकशी व्हावी : पाटकर
जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपीला पळून जाण्यास आयआरबी पोलिसाने मदत करणे ही घटना दुर्लक्ष करण्यासारखी नाही. सरकारचाही यात सहभाग आहे काय, याची चौकशी होणे गरजेचे आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. याप्रकरणी नैतिक जबाबदारी स्विकारून गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधीक्षकाने राजीनामा द्यावा, अशी मागणी पाटकर यांनी केली आहे.









