पाचगाव वार्ताहर
पाचगाव परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसा ढवळ्या होणाऱ्या घरफोड्यांमुळे पोलीस नेमकी करतात तरी काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पाचगाव आर के नगर परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. आर के नगर,रूमाले माळ,शिक्षक कॉलनी,रायगड कॉलनी आदी परिसरात मोठ्या प्रमाणात घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. शनिवारी दुपारी तर आर के नगर रूमले माळ येथे दिवसाढवळ्या घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले.
एकाच गल्लीत दोन वेळा चोरी
रुमाले माळ येथे दोन महिन्यांपूर्वी एका घरात चोरी झाली होती. त्याच गल्लीत दुसऱ्या घरात दोन दिवसांपूर्वी चोरी झाली. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रुमाले माळ येथे काही दिवसांपूर्वी दोन चोरट्यानी रात्रीच्या वेळी घरात लोक असतानाही कटावणीच्या सहाय्याने घरपोडी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नागरिक जागे होताच चोरट्यानी कटावणी तिथेच टाकून पलायन केले. यावेळी एका चोरट्याला तेथील कंपाउंडची तार लागून जखम झाली होती. त्याचे रक्तही त्या ठिकाणी पडले होते. पाचगाव,आर के नगर परिसरात घडणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांची गस्त घालणारी गाडी तर कित्येक दिवसात या परिसरात दिसली नसल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. यामुळे पोलीस नेमके करतात तरी काय असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत
पाचगाव आर के नगर परिसरात लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून यापैकी बहुतांशी कॅमेरे बंदच अवस्थेत आहेत . हे कॅमेरे सुरू असते तर चोरट्यांचा माग काढण्यासाठी कॅमेऱ्याचा उपयोग झाला असता . सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू कराण्याची मागणी करण्यात येत आहेत.
आर के नगर पोलीस चौकी नेहमी बंदच
आर के नगर येथे करवीर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी आहे. मात्र ही पोलीस चौकी बहुतांशी वेळा बंद अवस्थेत असते. या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस नियुक्त करावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.









