रत्नागिरी :
शहरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. रविवार 23 रोजी शहरातील भारतनगर साळवी स्टॉप येथील पालकर कुटुंबियांचा बंगला चोरट्यांनी फोडून 10 तोळे सोने व 2 लाख 22 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. हे कुटुंबिय मुलाच्या लग्नासाठी इस्लामपूर येथे गेल्याच्या संधीचा फायदा घेऊन त्यांच्या बंगल्याच्या मागचा दरवाजा फोडून चोरट्यांनी डल्ला मारला.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखलची प्रक्रिया गुरुवारी उशिरापर्यंत सुरु होती. शहरातील भारतनगर, साळवी स्टॉप येथे फिर्यादी फिरोज कुतबुद्दीन पालकर यांचा बंगला आहे. रविवारी दुपारी घरातील सर्व मंडळी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी इस्लामपूर येथे गेले होते. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मंगळवारी 25 फेब्रुवारी रोजी त्यांना फोन करुन चोरट्यांनी बंगला फोडल्याची माहिती दूरध्वनीवरून दिली. पालकर त्यानंतर रत्नागिरीत परतले. त्यावेळी त्यांच्या बंगल्याचा मागचा दरवाजा कोणत्या तरी धारदार हत्याराने तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील कपाटातील 10 तोळे सोने व रोख रक्कम 2 लाख 32 हजार ऊपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळविला. या प्रकरणी फिरोज पालकर यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. खबर मिळताच शहर पोलिसांचे पथक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.
- शिगमोत्सव, सुट्टीवर बंद घरे करून जाताना घ्या खबरदारी
शिमगोत्सवाच्या दिवसात घरफोडीच्या घटना नियमित घडतात. घर बंद करून नागरिक गावाकडे जातात. याच संधीचा फायदा घेऊन घरफोड्या मोठ्या प्रमाणात होत असतात. आजची घटना ही सराईत गुन्हेगाराकडून झाली असल्याचा अंदाज आहे. नागरिकांनी हॉऊसिंग सोसायटी तसेच बंगला आदी ठिकाणी सीसीटिव्ही लावून घ्यावेत, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांनी केले आहे.








