रत्नागिरी प्रतिनिधी
ऐन गणेशोत्सवात रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आह़े. रविवारी रात्री चोरट्यांनी शहरातील आनंदनगर भागातील डॉक्टरचा बंगला व गावखडी ब्राह्मणवाडी येथील बंगल्याला चोरट्यांनी लक्ष केल़े दोन्ही ठिकाणाहून हजारो रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची नोंद रत्नागिरी शहर व पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े.
शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कर्लेकरवाडी आनंद नगर येथे वास्तव्यास असणारे डॉ. मिलिंद कुलकर्णी हे शनिवारी सायंकाळी गणेशोत्सवासाठी ते धामणसे येथे कुटुंबियांसमवेत गेले होते. सोमवारी सकाळी ते रत्नागिरीत दाखल झाले. यावेळी बंगल्यामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल़े. चोरट्यांनी खिडकीमार्गे बंगल्यात प्रवेश करून पहिल्या मजल्यावर असलेली दोन कपाटे फोडल्याचे दिसून आल़े.
कपाटामधील 27 हजार रूपयांची रोकड, चांदीचा तांब्या, सोन्याची अंगठी व कानातला जोड असा एकूण 37 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल़ा या प्रकारानंतर शहर पोलीस निरिक्षक विनीत चौधरी यांनी घटनास्थळाला भेट दिल़ी. तसेच श्वान पथकाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आल़े. श्वानाला संशयित वस्तूंचा वास देऊन श्वान चोरट्यांचा माग काढत विश्वनगरपर्यंत धावत गेले व त्याच ठिकाणी घुटमळले.
सोन्याची मूर्ती ठेवली चोरी करताना चोरट्यांनी बंगल्यात सर्व भागात शोधाशोध केल़ी. यामध्ये देव्हारामध्ये देखील चोरटे शिरले होत़े. देव्हाऱ्यात सोन्यासह चांदीच्या मूर्ती होत्या. मात्र, त्या मूर्तींना त्यांनी हात लावला नाही. बंगल्याच्या मागील भागाला लोखंडी दरवाजा होता. त्या दरवाजाला देखील कुलूप लावलेले होते. या बंगल्यातून पळ काढताना चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप फोडले आणि मागच्या दरवाजाने ते पसार झाले. कुलूप फोडण्यासाठी त्यांनी कटावणीचा वापर केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
फॉरेन्सिक लॅबचे पथक दाखल
घरफोडी झाल्यानंतर ठसे मिळवण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत घेण्यात आली. फॉरेन्सिक लॅबचे एक पथक डॉ. मिलींद कुळकर्णी यांच्या घरी दाखल झाले. संपूर्ण बंगल्याची पाहणी करून या पथकाला चोरट्यांचे ठसे मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान, या प्रकरणी डॉ. मिलींद कुळकर्णी यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
पूर्णगडमध्ये बंगला फोडला
पूर्णगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत देखील घरफोडीचा प्रकार घडला आहे. एक बंद बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातून रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. एकाचवेळी रत्नागिरीत तालुक्यात दोन बंगले फुटल्याने पोलिसांनी देखील चोरट्यांचा माग काढण्यासाठी कंबर कसली आहे.