ओटी भरताना घटना : महिलांत भीतीचे वातावरण
बेळगाव : वडगाव मंगाईदेवी यात्रेनिमित्त देवीची ओटी भरण्यासाठी गेलेल्या महिला भक्ताच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे 16 ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळविले आहे. मंगळवारी सकाळी 11.30 च्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून याप्रकरणी मंदाकिणी भीमराव दावणे (वय 63) रा. तिसरा क्रॉस आनंदनगर वडगाव यांनी शहापूर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील वडगाव येथील मंगाईदेवीची यात्रा भरविण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी देवीचे गाऱ्हाणे उठविण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर भक्तांनी ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
देवीची ओटी भरण्यासाठी मंदाकिणी या मंदिराच्या खिडकीजवळ थांबल्या होत्या. गर्दीतून हातातील ओटीचे साहित्य देण्यासाठी त्यांनी हात वर केला असता गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे 16 ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसडा मारून पळविले. गर्दीत मंदाकिणी यांना काहीतरी घडल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी आपल्या गळ्याभोवती हात फिरवला असता मंगळसूत्र पळविण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लागलीच त्यांनी आरडाओरड करत चोरीची माहिती देवस्थान कमिटीला दिली. भरयात्रेत घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर मंदाकिणी यांनी शहापूर पोलीस स्थानक गाठून घडलेल्या परिस्थितीची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेऊन तपास चालविला आहे.









