गुंजी, करंबळ, देवलत्ती येथील नागरिकांत घबराटीचे वातावरण
खानापूर : खानापूर तालुक्यात पुन्हा चोरांनी डोकेवर काढले असून एकाच रात्रीत करंबळ, गुंजी, देवलत्ती या गावांतील 20 बंद घरे फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोने लंपास केले आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा चोर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मात्र पोलिसांकडून चोरांना पायबंद घालण्यात अपयश आल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी रात्री करंबळ, गुंजी, देवलत्ती येथील बंद घरे चोरट्यांनी लक्ष्य करून आपला डाव साधला आहे. करंबळ येथील सरस्वती सातेरी पाटील यांचे बंद घर फोडून तिजोरीतील रोख 25 हजार रुपये आणि दहा हजार किमतीचे लॉकेट लंपास केले आहे. तसेच दूध डेअरीचेही कुलूप तोडून कपाट्यातील तीन हजार रुपये लंपास केले. भैरु पाटील, विद्यानंद नार्वेकर, गुंडू रामचंद्र पाटील यांचीही बंद घरे लक्ष्य करण्यात आली. मात्र चोरट्यांना या घरात काहीही सापडले नाही. यानंतर चोरटे करंबळ येथून थेट देवलत्ती येथे पोहोचले. येथील बसवराज अक्की, राजशेखर कम्मार यांची बंद घरे फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना या ठिकाणी हाती काहीच लागले नाही. तालुक्यात एकाच रात्री 20 ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याने पोलिसांचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.
गुंजीत चोरट्यांनी आठ घरे फोडली : साडेतीन तोळे सोन्यासह दहा हजाराची रोकड लंपास
वार्ताहर/गुंजी
गुंजी येथील कुलूप बंद घरांना लक्ष्य करून एकाच रात्रीत चोरट्यांनी आठ घरे फोडून लाखो रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 10 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे. येथील नागरिक उमेश तमुचे, निलेश केशकामत, रमेश देसाई, नामदेव घाडी, जैतूनबी मुजावर, महादेव करंबळकर, राजाराम गुरव व पुंडलिक घाडी यांच्या घरांचा समावेश असून या सर्व घरांना कुलूप होते. त्यामुळे चोरट्यांनी समोरील दरवाजांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटांचे लॉकर्स तोडून कपडे व साहित्य विस्कटून ऐवजाचा शोध घेतला. मात्र उमेश तमुचे यांच्या घराव्यतिरिक्त इतर कोणाच्याही घरात ऐवज सापडला नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याची शहनिशा प्रत्यक्ष मालक घरात आल्यावरच समजणार असल्याचेही बोलले जात आहे. कारण यातील अनेकजण बाहेरगावी असल्याने ते दुपारपर्यंत घरी परतले नव्हते. मात्र त्यांनी मौल्यवान वस्तू आपल्या घरी ठेवल्या नसल्याचे दूरध्वनीवरून सांगितले आहे. उमेश तमुचे हे घरी परतल्यावर त्यांच्या कपाटातील एक सोन्याचे गंठण, चेन, अंगठी, कर्णफुले, जवळजवळ दहा ते बारा तोळे चांदीचे दागिने आणि दहा हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगितले.
चोरांच्या भीतीनेच दागिने घरात
उमेश यांची पत्नी समारंभानिमित्त परगावला गेली होती. मात्र बसमधील दागिने चोरण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन त्यांनी आपल्या गळ्dयातील सोन्याचे दागिने घरी ठेवले होते. मात्र एवढी दक्षता घेऊनही घरातूनच दागिने चोरीला गेल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. शिवणकाम करून पैसे कमवून मिळविलेले माझे दागिने पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन परत मिळवून द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी पोलिसांकडे केली. तसेच राजाराम गुरव यांच्या घरात चोरांनी प्रवेश करून कपाट फोडले होते. मात्र त्याचवेळी गल्लीतील एक युवक मोटारसायकलवरून आपल्या घराजवळ थांबल्याची चाहूल चोरांना लागताच चोर तेथून पसार झाले. त्यामुळे गुरव यांच्या कपाटात असलेली काही रोकड आणि घरातील दागिने सुरक्षित राहिले. लागलीच त्या युवकाने गल्लीतील इतर युवकांना या चोरीच्या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे सदर युवकांनी रात्री साडेतीन वाजता संपूर्ण गावात मोटारसायकलवरून फिरून लोकांना सतर्क केले. मात्र सकाळी एका पाठोपाठ एक अशा आठ घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याची माहिती पोलिसांना कळताच खानापूर क्राईमचे पीएसआय चन्नबसव बबली आणि शशी खामकर यांनी श्वानपथकासह घटनास्थळी पाहणी केली. सदर श्वान निलेश केशकामत यांच्या घरापासून स्टेशन रोडवरील भ्रमणध्वनी मनोऱ्यापर्यंत जाऊन घुटमळले. त्यानंतर ठसे तज्ञांना पाचारण करून चोरांच्या ठशांचे नमुने गोळा करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
चोरांची सतर्कता
गुरुवारी रात्री गुंजीतील आठ घरांमध्ये चोरट्यांनी चोरी केली. यामध्ये एका गल्लीमध्ये दोन, दुसऱ्या गल्लीत तीन व इतर ठिकाणी तीन अशी घरे फोडली. मात्र ही चोरी करत असताना आजूबाजूच्या शेजारच्या घरातील लोकांना याचा थांगपत्ताही लागू नये याची खबरदारी घेतली. लोकांना बाहेर येता येऊ नये याकरिता गल्लीतील सर्व घरांना बाहेरून कडी लावण्यात आली होती. तसेच सर्व घरांचे कुलूप हे एखाद्या धारदार कटरने तोडण्यात आले होते. कपाटांचेही लॉक अत्यंत शिताफिने खोलल्याने सदर चोरटे सराईत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी सदर चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









