प्रतिनिधी/ बेळगाव
सुकामेव्याच्या दुकानातून 50 हजार रुपयांचा बंडल पळविल्याच्या घटनेसंबंधी धागेदोरे हाती आले असून खरेदीच्या बहाण्याने दुकानात येऊन रोकड पळविणाऱ्या बंटी आणि बबलीचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी बोलून दाखविला.
शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास खरेदीच्या बहाण्याने देशपांडे गल्ली येथील शगुन ड्रायफ्रुट्स या दुकानात आलेल्या भामट्याने चिल्लर मागण्याच्या बहाण्याने कामगार तरुणीचे लक्ष विचलित करून गल्ल्यातील 50 हजार रुपये रोकड पळविली होती.
सीसीटीव्ही फुटेजवरून खडेबाजार पोलिसांनी भामट्यांचा शोध सुरू केला आहे. रोकड पळविल्यानंतर ज्या ऑटोरिक्षातून भामट्यांनी पलायन केले, त्या ऑटोरिक्षाचालकाचा शोध घेण्यात आला असून त्याची चौकशी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून या बंटी आणि बबलीचा शोध घेण्यात येत आहे.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास हाती घेतला आहे. भर बाजारपेठेत कामगार तरुणीचे लक्ष विचलित करून रक्कम पळविणारे भामटे कोण? याचा लवकरच उलगडा होणार आहे. भामट्यांची छबी स्पष्टपणे सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या छबीवरून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.









