घरफोड्यांपाठोपाठ प्रमुख मंदिरेही लक्ष्य : पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह; तपास सुरू असल्याची माहिती
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. गुन्हेगारांनी घरे, दुकाने आदींपाठोपाठ मंदिरांनाही लक्ष्य बनविले आहे. बेळगाव पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले असून वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांमुळे पोलिसांची गस्त व्यवस्थित सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एका रात्रीत मुख्य बाजारपेठेतील 10 हून अधिक दुकाने फोडण्यात आली आहेत. घरफोड्या तर सुरूच आहेत. खास करून उपनगरातील बंद घरांना चोरट्यांनी आपले लक्ष बनविले आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याची छबी कैद झाली आहे.
मेणसे गल्ली येथील औषध दुकान फोडताना तर चौघा जणांचे चेहरे स्पष्टपणे दिसतात. हे गुन्हेगार स्थानिक आहेत की बाहेरचे याचाही उलगडा झाला नाही. केवळ गेल्या आठवड्याभरातील चोऱ्या, घरफोड्यांच्या घटना लक्षात घेता पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. गस्त व्यवस्थित व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ई-बिटची व्यवस्था सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील एका रात्रीत 10 दुकाने फोडली तरी गस्तीवरील पोलिसांना रात्री फिरणारे गुन्हेगार कसे सापडले नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या काळ्या यादीतील चोऱ्या, घरफोड्या प्रकरणातील बहुतेक गुन्हेगारांची धरपकड झाली आहे. त्यामुळे हे नवे गुन्हेगार कोठून आले? याचा शोध घ्यावा लागणार आहे. यासंबंधी गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्याशी संपर्क साधला असता तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्यांच्या मुसक्या आवळा
गुन्हेगारांनी तालुक्यातील प्रमुख मंदिरांनाही लक्ष बनविले आहे. गेल्या आठवड्यात बस्तवाड (हलगा) येथील विठ्ठल रखुमाई मंदिर फोडण्यात आले होते. या पाठोपाठ आता कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर व गणेश मंदिरातही चोरी झाली आहे. गुन्हेगारांनी धार्मिकस्थळांनाही लक्ष बनविले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून तालुक्यात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









