साडवली सह्याद्रीनगर परिसरात घबराट; चार बंगले फोडण्याचा झाला प्रयत्न
प्रतिनिधी / देवरुख
देवरुख नजीकच्या साडवली सह्याद्रीनगर येथील गौरीविहार परिसरातील तब्बल 6 बंगले चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. दोन बंगल्यातील मिळून 93 हजार 500 रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरट्यानी लंपास केले आहेत. चार बंगल्यांमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.
हेही वाचा >>>> जेली चॉकलेटने श्वास कोंडून 9 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू
याबाबत देवरुख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश महादेव लिंगायत यांच्या घरातून अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या दोन बांगड्या व सहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 73 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. अर्चना चंद्रकांत डोंगरे यांच्या घरातील 20 हजार रुपये किमतीचे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट चोरट्यांनी लांबविले. तर याच परिसरातील आणखी चार बंगले फोडण्याचा या चोरट्यांनी प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती या बंगल्यातून काहीच लागले नाही.
हेही वाचा >>>> खेड सात्विनगाव येथे वनकर्मचाऱ्यावर हल्ला
बंगले फोडल्याची माहिती देवरुख पोलिसांना सोमवारी सकाळी मिळताच, पोलिस उपनिरीक्षक विद्या पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार डी.एस.पवार, हे. कां. प्रशांत मसुरकर, पोलीस कॉन्स्टेबल वैभव नटे, पो.काँ.रोहित यादव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
यामध्ये चार बंगल्यांमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर दोन बंगल्यांमधून एकूण 93 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले आहे.दरम्यान, या चोरीचा छडा लावण्यासाठी देवरुख पोलिसांनी रत्नागिरीतून श्वान पथक, ठसेतज्ञ व फॉरेन्सीक टीमला पाचारण केले होते. याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी घटनास्थळी पाहणी केली.
या चोरीच्या घटनेची नोंद देवरुख पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. चोरट्यांवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलिस करीत आहेत.