20 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने-रोकड लांबवली : परिसरात खळबळ
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या सुरूच आहेत. रविवारी महात्मा फुले रोड, शहापूर येथील दोन बंद घरांचा कडीकोयंडा तोडून सुमारे 20 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून एकाच इमारतीतील अमोरासमोरील घरे फोडण्यात आली आहेत. शहापूर पोलीस स्थानकात या दोन्ही घटनांची नोंद झाली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी विधिविज्ञान प्रयोगशाळेतील तज्ञांना पाचारण करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.
महात्मा फुले रोडवरील श्रीकृपा अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावरील दोन घरे फोडण्यात आली आहेत. प्रकाश रामचंद्र देसाई यांचे याच परिसरात किराणा दुकान आहे. रविवार दि. 20 एप्रिल रोजी दुपारी आपल्या घराला कुलूप लावून पत्नी, मुलगा, सून आदी कुटुंबीयांसमवेत कौटुंबिक कार्यक्रमासाठी कुद्रेमनीला गेले होते. दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांचा त्यांना फोन आला. तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे, असे सांगितल्यानंतर ते सर्वजण कुद्रेमनीहून बेळगावला परतले. चोरट्यांनी तिजोरी फोडून 172 ग्रॅम 750 मिली सोने, 107 ग्रॅम चांदीचे दागिने पळविले आहेत. एकूण 11 लाख 34 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविल्याचे उघडकीस आले आहे.
भरदिवसा चोरीच्या घटना
प्रकाश यांच्या घरासमोरच असलेल्या स्मिता नामदेव पाटील यांचे तिसऱ्या मजल्यावरील घर फोडण्यात आले आहे. रविवारी स्मिता व कुटुंबीय आपल्या घराला कुलूप लावून खानापूरला गेले होते. त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 6 लाख 75 हजार 800 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविली आहे. भरदिवसा घडलेल्या चोरीच्या या घटनांनी परिसरात खळबळ माजली आहे.









