नागरिकांत घबराट : कुटुंबीय परगावी असल्याने आल्यानंतर होणार उलगडा
वार्ताहर/गुंजी
केवळ 25 दिवसांपूर्वी गुंजीत एकाच रात्रीत 8 घरे फोडून 5 तोळे सोने आणि 20 हजारांची रोकड लांबविली होती. ही घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याची घटना घडल्याने गुंजीसह परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. येथील नागरिक नागो नाळकर हे आपल्या घराला कुलूप लावून परगावी गेले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि घरातील कपाट फोडून सर्व साहित्य व कपडे विस्कटून टाकले. तसेच पलंगावरील गादीही विस्कटून टाकली असून संपूर्ण डब्यांची झाकणे काढून प्रत्येक डब्यामध्येही चोरट्यांनी पाहिले असल्याचे दिसून येत आहे.
मात्र सदर कुटुंब परगावी असल्याने नेमका कोणता ऐवज चोरट्यांना हाती लागला हे सांगणे कठीण झाले आहे. सकाळी दरवाजा उघडा असलेला पाहून शेजाऱ्यांनी त्यांना दूरध्वनीवरून घरात चोरी झाल्याची कल्पना दिली. याविषयी त्यांना दूरध्वनीद्वारे विचारले असता आपण परगावी असून घरात मौल्यवान कोणत्याही वस्तू नाहीत मात्र लहान मुलांचे दागिने व छोट्या मोठ्या वस्तू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सदर कुटुंबीय घरी आल्यानंतरच कोणता ऐवज चोरीला गेला आहे. याची शहानिशा होणार आहे.
चोरट्यांवर पोलिसांचा वचक नाही
गुंजीत महिनाभरात दुसऱ्यांदा चोरीची घटना घडली आहे. यापूर्वी घडलेल्या चोरीचा गुन्हा पोलिसात नोंद झाला असून त्याचा तपास सुरू आहे. सदर घटना ताजी असतानाच पुन्हा चोरट्यांनी चोरीचे सत्र सुरूच ठेवले असल्याने चोरट्यांवर पोलिसांचा वचकच नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. त्यामुळेच चोरटे सैराट झाले असून वारंवार चोऱ्या करीत आहेत. तरी पोलिसांनी गुंजीतील चोरीचा त्वरित तपास लावावा तसेच चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









