वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या ब्रिस्बेन पुरूषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने ऑस्ट्रियाच्या थिएमवर विजय मिळविला. जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर नदालचे टेनिस क्षेत्रात पुनरागमन झाले असल्याने हा विजय त्याला अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
मंगळवारी येथे झालेल्या पुरूष एकेरीच्या सामन्यात नदालने थिएमचा 7-5, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. गेल्या वर्षी नदालला ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर त्याला वारंवार गुडघादुखापतीची समस्या जाणवू लागल्याने त्याने गुडघ्यावर शस्त्रक्रिया करुन घेतली होती.
या स्पर्धेत पुरूष एकेरीच्या अन्य एका सामन्यात जर्मनीच्या हेनेफमनने अमेरिकेच्या पाचव्या मानांकित सेबेस्टियन कोर्दाचा 7-5, 6-4 तर स्लोव्हेकियाच्या लुकास क्लिनने अर्जेंटिनाच्या बाएझचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. महिलांच्या विभागात बेलारुसची माजी टॉप सिडेड अझारेंकाने रशियाच्या अॅना कॅलिनस्कायचा 6-1, 7-6 (10-8), ऑस्ट्रेलियाच्या रॉडी नोव्हाने सोफीया केनिनचा 7-5, 7-6 (9-7) असा पराभव करत पुढील फेरी गाठली.









